Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेचे निषेध आंदोलन

बुलडाणा, 5 जुलै – शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक परिषदेच्या वतीने शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. शिक्षक परिषद जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन 5 जुलै रोजी देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालकांच्या प्रश्नांसाठी नित्य कार्यरत असते. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रूजू झालेले कर्मचारी यांना विनाविलंब जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यात यावी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना 10, 20 व 30 वर्ष सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करावी, कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना विशेष पगार व अनुकंपा योजना लागू करावी, अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकड्यांना निधीसह अनुदान प्राप्त घोषित करावे, अनुदात्या शाळेतील अतिरिक्त शिक्षक व कर्मचारी यांना सेवा संरक्षण देण्यात यावे, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता देण्यात यावी, अपंग समावेश शिक्षक योजना अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांना नियमित व थकित वेतन अदा करावे व त्यांचे समायोजन करावे, टीईटी ग्रस्त शेतकर्‍यांना सेवासंरक्षण देऊन त्यांना मुलाखतीसाठी संधी द्यावी, संगणक शिक्षकांना पूर्ववत सेवेत रूजू करून सेवा संरक्षण देण्यात यावे.

SHIKSHAK PARISHAD


ग्रंथपालांच्या प्रलंबित मागण्यांसाठी स्वतंत्र बैठक आयोजित करावी, सातव्या वेतन आयोगाचा थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता तात्काळ अदा करण्यात यावा, गैरप्रकार व भ्रष्टाचार करणार्‍या शाळांवर तात्काळ प्रशासक नियुक्त करावे, मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती वेतन प्रकरण व अन्य दस्ताऐवजावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार शिक्षण अधिकारी यांना बहाल करण्यात यावे, क्रीडा विभागातील अनुदान विभागात होणारा भ्रष्टाचार थांबविण्यात यावा, आरोग्य विमा त्वरीत लागू करण्यात यावा अशा एकूण 31 मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षणसचिव यांना देण्यात आले. शासनाचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळेत काळ्या फिती लावून 5 जुलै रोजी काम करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांना शिक्षक परिषदेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह प्रविण महाजन, प्रसिध्दी प्रमुख अनिल पाटील, गजानन गिर्‍हे, अरविंद कोलते, गणेश सांगळे, प्रमोद देशमुख, रविंद्र गणेशे यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.