बुलडाणा दि.15 : -राज्यात विभागाच्या प्रयोगशाळा मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे आहे. जनतेला चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ व औषधे मिळण्याकरीता विभागाच्या अधिपत्याखालील अत्याधुनिक प्रयोगशाळा महत्वाची भूमिका पार पाडतात. अशा प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू केल्यास विभागाचे कामकाज सुरळीतपणे होईल. त्यामुळे अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या सर्व जिल्ह्यांसाठी वाशिम येथे होणारी प्रयोगशाळा सोयीची ठरणार आहे. प्रयोगशाळेतील पदनिर्मितीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा. या प्रयोगशाळेचे काम तातडीने पुर्ण करावे, असे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिले.
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथील विश्राम गृहात 14 जुन रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी आढावा घेताना मंत्री डॉ शिंगणे बोलत होते. यावेळी अमरावती विभागातील सह आयुक्त (अन्न) सुरेश अण्णापुरे, सह आयुक्त अशोक बरडे, सहा. आयुक्त श्री. घरोटे, सहा. आयुक्त (औषधे) विनय सुलोचने, सागर तेरकर, हेमंत मेटकर, अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे आदी उपस्थित होते.
अमरावती विभागात प्रतिबंधत्मक अन्न पदार्थ व गुटखा विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना देत मंत्री डॉ शिंगणे म्हणाले, राज्यामध्ये अवैध गुटखा, प्रतिबंधात्मक अन्न पदार्थ विक्री रोखण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. तरी या प्रयत्नांना पुढे नेत अमरावती विभागात अवैध गुटखा विक्री होत असल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी. अशा प्रकारच्या कारवाई विभागात वाढवाव्यात.
ते पुढे म्हणाले, म्युकर मायकोसिस आजार कोविड रूग्णसंख्या कमी होत असल्यामुळे कमी झालेला दिसत आहे. या आजारावरील औषधे महागडी असून त्याचे रेशनिंग आवश्यक आहे. म्युकर मायकोसिस वरील अँटी फंगल औषधांचा तुटवडा होवू देवू नये. ही औषधे शासकीय रूग्णालयांमार्फतच रूग्णांना देण्यात येत असून खाजगीमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यासाठी शासन सकारात्मक असून लवकरच रिक्त पदांची भरती घेण्यात येणार आहे. तसेच दुध, अन्न पदार्थ तपासण्यात यावेत. भेसळीचे प्रमाण निदर्शनास आल्यास तपासणीचे प्रमाण वाढवावे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रभाव बघता अन्न पदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छता पाळावी. उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करू नये. याबाबत विभागाने मोहिम राबवून अन्न पदार्थ तपासावेत. कुठेही अन्न पदार्थांमुळे अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही मंत्री डॉ शिंगणे यांनी केले.