Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास दंडाची वसूली

  • कोविड प्रतीबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक
  • जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश लागू  

बुलडाणा, दि. 30 :  कोविड 19 विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी यापूर्वी वेळोवेळी निर्बंध लावण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांच्या आदेशांचे अधिक्रमण करून जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील कार्यांना कोविड 19 ची सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार काही शर्तींच्या अधीन राहून खुले करण्याबाबत निर्बंधासह प्रतिबंधात्मक आदेश पारीत केला आहे. त्यानुसार कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी 500 रूपये इतका दंड करण्यात येणार आहे.

mask

  प्रत्येकाने कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करावे. राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे (CAB) सेवा प्रदाते, परिवास्तुंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोविड अनुरुप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार असणार आहे.

   पात्र लाभार्थ्यांना संपुर्ण लसीकरण आवश्यक आहे.  तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती जसे खेळाडू, अभिनेते, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे, संपूर्ण लसीकरण केलेले असावे. जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ (मेळावे) आदी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींव्दारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegramMahaGov UniversalPass Bot) हा, संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल, अन्यथा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविण प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यवसायीकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

  कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या निर्देशांव्दारे विनियमन करण्यात येईल. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे, एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र ते बाळगतील. चित्रपट गृह, नाटयगृह, मंगल कार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त /बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या/ समारंभाच्या/ उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संपूर्ण खुल्या असलेल्या जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभासाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधिच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास, अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.

  कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकुण लोकांची संख्या 1 हजारांपेक्षा अधिक असेल तर, अशा बाबतीत, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल. अशा कोणत्याही संमेलानाची (मेळाव्याचे) निरिक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी तहसिलदार तथा इन्सीडंट कमांडर व मुख्याधिकारी नगर परिषद अथवा नगर पंचायत हे त्यांचे प्रतिनिधी पाठवतील आणि तेथे वर नमुद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड -19 च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता तेथे कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर, तहसिलदार व मुख्याधिकारी यांना कार्यक्रम पुर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल.

 संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ, लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर 14 दिवस आलेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे. किंवा ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा, अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. तसेच 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा आहे.

                                                      कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम व दंड

      नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहीजे. (रूमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असले.) जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (6 फुट अंतर) राखा. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/ डोळे/ तोंड यांना स्पर्श करणे टाळा. योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जतुक करा. खोकतांना किंवा शिंकतांना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा; जर एखादयाकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वत:चा हात नवे तर हाताचा वाकवलेला कोपर नाका तोंडावर ठेवून खोकावे व शिंकावे.  सार्वजनिक ठिकाणी थंकू नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा व सुरक्षित अंतर राखा, कोणालाही शारिरीक स्पर्श न करता नमस्कार अथवा अभिवादन करा.

   या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल, ज्यांनी, आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यांदीवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे. अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुध्दा रुपये 10 रूपये इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक आदींमध्ये कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असे पर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

   जर एखादया संस्थेने किंवा आस्थापनेने, स्वत:च कोविड अनूरुप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपध्दतीचे पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, रूपये 50,000 इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असे पर्यंत, ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर कोणत्याही टॅक्सी, खाजगी वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनात, कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात अशा व्यक्तींना, 500 रुपये इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहन चालक, मदतनिस किंवा वाहक यांना देखील 500 रूपये इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसूरीच्या प्रत्येक प्रसंगी, रूपये 10,000 इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर  केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असे पर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

  कोविड अनुरुप वर्तणुकी संबंधीच्या वर नमुद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास, वर नमुद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे, उल्लंघन करणाऱ्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरुप वर्तनाचे नियम, धोरणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमुद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय , मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार असणार आहे. असे आदेशात नमूद आहे

Leave A Reply

Your email address will not be published.