Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

बुलढाणा जिल्ह्यातील उपकेंद्र उभारणीच्या कामांना गती द्यावी-ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई, दि. 30 : बुलढाणा जिल्ह्याच्या विद्युत पायाभूत आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेली उपकेंद्र उभारणीची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करावीत, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. बुलढाणा जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची आढावा बैठक अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणाचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी या सूचना दिल्या.

nitin raut
मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी, एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत मंत्रालयातून तर नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता, बुलढाणाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या मान्यतेने बुलढाणा जिल्ह्यात नवीन 21 उपकेंद्रांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर ही उपकेंद्रे तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश डॉ. राऊत यांनी दिले. तसेच डॉ. शिंगणे यांच्या सूचनेनुसार रताळी आणि राजेगाव येथे नवीन 33/11 केव्ही उपकेंद्र उभारण्याचा समावेश आराखड्यात करावा. तसेच लव्हाळा येथे 132/33 केव्ही अतिउच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्र उभारण्याच्या मागणवरही व्यवहार्यता तपासून कार्यवाही करावी, अशाही सूचनाही त्यांनी दिल्या.

महावितरणच्या उपअभियंता, कनिष्ट अभियांता आदी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी निवासी असावे यासाठी तात्काळ परिपत्रक काढावे. जे अधिकारी मुख्यालयात राहणार नाहीत त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात यावा अशा स्पष्ट सूचना देऊन डॉ. राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लोकांचे दूरध्वनी संदेश तात्काळ स्वीकारावेत तसेच मोबाईल बंद करुन ठेऊ नयेत, असे निर्देश दिले.

 जिल्ह्यातील महावितरणच्या रिक्त पदांचा आढावा घेऊन अभियंत्यांच्या तसेच तारतंत्री कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याच्या डॉ. शिंगणे यांच्या सूचनेवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले. महावितरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने कोरोना लसीकरण करुन घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
Leave A Reply

Your email address will not be published.