
हिंगोली : शहरासह जिल्ह्यामध्ये आज 11 जुलै रोजी सकाळी आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षापासून भूगर्भातून गुढ आवाज येऊन जमीन हादरल्याच्या वारंवार घटना घडत आहेत. वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी यासह आता हिंगोली शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सौम्य प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे नेहमीपेक्षा आज औंढा तालुक्यात जाणवलेला धक्का हा सर्वाधिक जाणवल्याचे ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. त्यामुळे भूकंपाचा आवाज जाणवल्यास नागरिकांनी घरामध्ये न थांबता बाहेर मोकळ्या जागेत यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.