गोखले इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या आर्थिक विभागाच्या संचालकपदी
सामान्य शेतकऱ्याचा मुलगा कष्टाच्या व शिक्षणाच्या बळावर अशक्य ते शक्य करू शकतो… गगन भरारी घेऊन उच्च पदापर्यंत पोहचू शकतो… याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट मधील सहयोगी प्राध्यापक डॉ नरेश बोडखे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ(बिबी) या गावापासून डॉ नरेश बोडखे यांचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सहज नव्हता. आई-वडील शेतकरी, आठमाही व पाऊसावर आधारित शेती असल्यानं घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे शिक्षण हे एकमेव साधन की, ज्यामुळे आपली परिस्थिती बदलू शकते याचं भान डॉ नरेश बोडखे यांना होतं. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयात घेतले. त्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून महाविद्यालयीन जीवनात हॉटेल मध्ये काम करून आणि घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचं काम करून डॉ नरेश बोडखे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. इंग्रजी साहित्यात जालन्यातील बद्रीनारायणजी बारवाले महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि पदवीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
पदवीनंतर पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात इंग्रजी माध्यमातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. डॉ नरेश बोडखे हे पहिल्याच प्रयत्नात सेट व नेट परीक्षा पास झाले. त्यानंतर लगेचच अवघ्या तेविसाव्या वर्षी मुंबई मधील चेतना महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
सर्व छान सुरू होतं. परंतु, स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे डॉ नरेश बोडखे यांनी पुढच्या टप्प्यावर जाण्याची तयारी सुरू केली. त्यात त्यांची भारतातील अर्थशास्त्राचे पाहिले व नामांकित विद्यापीठ असलेल्या पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
गोखले इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर कामासाठीची अनेक कवाडे खुली झाली होती. डॉ नरेश बोडखे यांनी गोखले इन्स्टिट्यूट मध्ये आल्यानंतर जालना जिल्ह्याचे 20 वर्षांसाठीचे व्हिजन डॉक्युमेंट बनवले. केळकर समितीमध्ये आणि पंधराव्या वित्त आयोगामध्ये काम केले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प निर्मिती मध्येही त्यांनी काही काळ सहभाग नोंदवला आहे. इथेच त्यांनी पीएच डी पूर्ण केली. याबरोबरच अनेक प्रकल्पांवर संशोधन करतानाच विद्यार्थी घडविण्याचं बहुमुल्य कार्य देखील सुरू ठेवले. अनेक बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या मुलांना ते अविरत मार्गदर्शन करत आहेत.
केंद्र सरकारच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संचालकपदी निवड झालेल्या डॉ नरेश बोडखे यांना आता देश पातळीवर काम करता येणार आहे. ज्याप्रमाणे रिझर्व्ह बँक बँकिंग क्षेत्राचं नियंत्रण करते, सेबी शेअर मार्केट व गुंतवणूकीसंदर्भातील नियंत्रण व नियोजनाचे काम करते. तसेच कॉम्पिटिशन कमीशन ऑफ इंडिया हे देशातील मार्केटचं नियंत्रण करते. यामध्ये होणाऱ्या स्पर्धा विरोधी कारवाया रोखण्यासाठी व चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी काम होते.
शेतकऱ्याचा मुलगा केवळ शिक्षणामुळे उच्च पदापर्यंत पोहचला. आणि म्हणून शिक्षणाचं महत्व सर्वाधिक आहे. न थांबता, परिस्थितीचा बाव न करता ग्रामीण भागातील मुलांनी शिक्षणाची कास धरावी आणि उज्ज्वल भवितव्य घडवावं, असं प्रामाणिक मत डॉ नरेश बोडखे व्यक्त करतात.त्यांच्या निवडी बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.