महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी आ डॉ संजय कुटे यांचं नाव आघाडीवर.
गजानन सोनटक्के जळगाव जा – भाजपचे (BJP) महाराष्ट्रातील मोठे नेते हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत त्यांच्या बैठका सुरु आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे नेते तिथे आहेत. तेव्हापासून भाजपमधील वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्यांच्या चर्चा सुरु आहेत. भाजपचा महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार यानिमित्त या बैठका सुरु असल्याचं समजतं आहे भाजपकडून जी नावं दिली जात आहे किंवा ज्या नावांची चर्चा सुरु आहे त्या सगळ्यात आघाडीवर जे नाव आहे ते डॉ. संजय कुटे यांचं. हे नाव पुढं आणण्यासाठी भाजपचं नेमकं काय राजकारण असणार आहे हे आपणं जाणून घेणं गरजेचं आहे.
संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्मपासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. मुळचे बुलडाण्यातील आहेत. मागील काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात आहेत.
महाराष्ट्रात भाजपवर जर कोणाचा पगडा असेल पूर्णपणे तर तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे. संजय कुटे हे फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळेच त्यांचं नाव हे अध्यक्षपदासाठी फडणवीसांकडून पुढे केलं जात असल्याचं सूत्रांकडून खात्रीलायकरित्या समजतं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी संजय कुटे यांचं नाव का आहे चर्चेत?
संजय कुटे यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुढे करण्यासाठी ओबीसी राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पाहिले तर लक्षात येईल की, सगळे मराठा समाजाचे नेते होते.
आता महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती हाताळायची असेल तर ती परिस्थिती बघता जर ओबीसी नेतृत्व पुढे आणायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाचा हा बदल होऊ शकतो. कारण एकीकडे पंकजा मुंडे यांनी फडणवीसांविरोधात एक प्रकारे एल्गारच पुकारला आहे. त्यामुळे नवं ओबीसी नेतृत्व पुढे आणायचं असेल तर संजय कुटे हे अगदी योग्य नाव असल्याचं फडणवीसांना वाटतं आहे. म्हणूनच त्यांचं नाव पुढे केलं जात आहे.
संजय कुटे हे सध्या महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत. दरम्यान, भाजपच्या नेत्यांची अचानक दिल्ली वारी का सुरु आहे याबाबत अधिकृत काहीही कारण देण्यात आलेलं नाही. पण अशावेळी संजय कुटे हे दिल्लीत असणं हे कुठेतरी संकेत देणारं आहे की, ते प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत.
ओबीसी मतदार भाजपचा नेहमीच मोठा मतदार राहिलेला आहे. ओबीसी समाजाचं राजकारण आता महाराष्ट्रात तापू लागलं आहे. त्यामुळे आता एक नवी खेळी पक्षाकडून केली जाऊ शकते. मात्र असं असताना अनेक दिग्गज नेते हे ओबीसी आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यासारख्या नेत्यांना डावलून संजय कुटे यांचंच नाव सध्या का चर्चेत आहेत? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या शेवटचा जो मंत्रिमंडळ विस्तार केला होता त्यावेळी त्यांनी संजय कुटे यांना देखील त्या मंत्रिमंडळात घेतलं होतं. त्यावेळी त्यांना कामगार आणि ओबीसी मंत्रालय देण्यात आलं होतं. पण मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ अवघ्या 3 ते 4 महिन्याचा होता. कारण त्यानंतर लागलीच विधानसभा 2019 च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.