प्रतिनिधी ( देऊळगाव राजा ) – कोरोनाचे संकट असताना त्यात केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली असून याचा फटका प्रत्येकाला बसत आहे तसाच तो शेतकऱ्यांनाही बसत आहे . कोरोना काळात शेतकऱ्याचे या महागाईमुळे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यास आर्थिक हातभार लावणे गरजेचे असताना अद्यापही बँकेने पीक कर्ज वाटपास सुरुवात केली नाही. त्यामुळे त्वरीत पीक कर्ज वाटपास सुरवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे युवा नेते आकाश जाधव यांनी केली आहे.
कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकरी वर्गाला कोरोनाव्यतिरिक्त अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामात व शेतीमाल विक्रीला नेण्यासाठी यामुळे अधिकचा पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्च निघणेही कठीण झाले आहे. यातच केंद्र शासनाने खताच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. सदर दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येते. कोरोना महामारीच्या संकटाविषयीचा प्रश्न समोर करून अद्यापपर्यंत कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास सुरुवात केली नाही. एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहायला नको , तसेच अनेक शेतकरी पीक कर्ज वाटपाबाबत फोनवर विचारणा करीत आहे. मात्र त्यांना बँकेचे अधिकारी काहीच उत्तर देत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. त्यामुळे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याप्रकरणाची दखल घेवून सर्व बँक शाखेला आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात. तसेच गावनिहाय शेतकऱ्यांना बँकेत बोलावून अथवा गावनिहाय कॅम्पचे आयोजन करून त्वरित पीक कर्ज वाटपसंबंधीच्या प्रक्रियेस सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी केली आहे.