Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे बायोगॅस ,स्वयंपाकासाठी इंधन तर शेतीसाठी सेंद्रिय खताची होते निर्मिती

किनगावराजा आनंद राजे (प्रतिनिधी) सद्य परिस्थितीत घरगुती स्वयंपाकासाठी वापरात येणाऱ्या इंधनाच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे प्रत्येकालाच सतत आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण भागात याआधी ही समस्या नव्हती परंतु वृक्षतोड बंदीमुळे घरोघरी गॅस आल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या शेतकरी वर्गासही महिन्याला गॅस खरेदी करणे अनिवार्य झाले आहे.यावर केंद्र सरकारने जवळपास १०० टक्के अनुदान असलेल्या बायोगॅस (जैववायू) च्या निर्मितीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.केंद्र शासनाच्या या योजनेला किनगावराजा येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा शेतकरी असलेल्या श्री.ज्ञानेश्वर श्रीधरराव घिके यांनी आपल्या घराजवळील जागेत बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प निर्माण करून त्यास कृतीची जोड दिली आहे.


श्री.घिके यांनी माहिती देतांना सांगितले की,आमच्याकडे गायी,म्हशी मिळून एकूण २० जनावरे आहेत.बायोगॅसच्या निर्मितीसाठी महत्वाचे असलेले शेण जनावराद्वारे उपलब्ध झाल्यामुळे तलाठी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभरापूर्वी बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प सुरु केला.सुरुवातीस बायोगॅसच्या संयंत्रात चिंचेचा पाला,चक्कीतील खराब झालेले पीठ टॅंकमध्ये सडवा म्हणून वापरले.त्यानंतर दररोज ५० किलो शेण व ५० लिटर पाणी वापरून गॅस निर्मितीस प्रारंभ केला.सध्या दररोज २ किलो गॅसची निर्मिती होत असून सुरुवातीस २१ दिवसात गॅसची सिलेंडर संपत होते तेच आता ३५ दिवस चालत असल्याचे घिके यांनी सांगितले आहे.


गॅस निर्मितीनंतर संयंत्रातून बाहेर पडणाऱ्या शेणाच्या रबडीपासून दर्जेदार अशा सेंद्रिय खताची निर्मिती होत असून एका वर्षात जवळपास ८ ट्रॉली उच्चतम खत मिळते.शेतात नांगरणी करण्याच्या अगोदर शेणखत पसरवून नांगरणी करून खत व्यवस्थित मिसळल्याने उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे घिके यांनी सांगितले.पूर्वी १७ एकर जमिनीसाठी जवळपास २ लाख रुपयांचे रासायनिक खत घ्यावे लागत होते आता फक्त १६ ते १७ हजार रुपयांचेच रासायनिक खते घ्यावी लागतात हा फायदा झाल्याचे सांगितले.सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस कायम वाढत असून शेतातील अनावश्यक तण नष्ट झाल्याची माहिती घिके यांनी यावेळी दिली.बायोगॅसच्या निर्मितीसाठी सुमारे ३५ हजार रुपयांचा खर्च लागला असून २१ हजार रुपयांचे अनुदान मिळाले असल्याचेही घिके यांनी सांगितले.


येथील बायोगॅसच्या प्रकल्पास सिंदखेडराजा पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी सूनगत, विस्तार अधिकारी दराडे,पटवारी आढाव यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले असून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाची जीवनशैली बायोगॅस निर्मितीच्या माध्यमातून हमखास बदलणार असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे गुरे असतील त्यांनी बायोगॅस निर्मिती करावी असे आवाहन ज्ञानेश्वर घिके यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

प्रतिक्रिया,ज्ञानेश्वर घिके :- ज्या शेतकऱ्याजवळ ४ किंवा त्यापेक्षा अधिक म्हैस असतील त्यांनी अवश्य बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती करावी यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खताची निर्मिती बायोगॅसच्या माध्यमातून होत असल्याने शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवर होणारा प्रचंड खर्च वाचतो तसेच स्वयंपाकासाठी लागणारा गॅस विकत घेण्याची कधीच आवश्यकता नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.