बुलडाणा दि.15 : देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून देशाने विविध अडचणी, समस्या व आव्हानांवर मात करीत नेत्रदिपक प्रगती साधली आहे. मात्र सध्या आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातून जात आहोत. कोरोनाला मात देण्यासाठी राज्य शासन सर्व ताकदीनिशी लढत आहे. शासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली आहे. कोरोनाशी लढत आपली अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. केंद्र शासनाने आत्मनिर्भर अभियानाची घोषणा करीत अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोना विषाणूला हरवित जिल्हा सर्वच क्षेत्रात नव्या उमेदीने भरारी घेणार आहे, असे प्रतीपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जि.प अध्यक्ष मनिषाताई पवार, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, जि.प उपाध्यक्ष कमलताई बुधवत, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदींसह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात येत असलेला प्रत्येक निर्णय, दिलेली प्रत्येक सूचना याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अगदी मनापासून काम करीत असल्याचे सांगत पालकमंत्री महणाले, आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील 86 हजार 620 पेक्षा जास्त कोरोना रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. दुसरी लाट नियंत्रणात येत नाही तोच कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा आरोग्य संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये जास्त संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी स्त्री रूग्णालय येथे 50 बेड, खामगांव व शेगाव येथे प्रत्येकी 50 बेड, इतर सर्व ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात प्रत्येकी 15 बेड लहान बालकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यात पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. तसेच पाच प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. एकूण 10 प्रकल्पांमधून 10 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 59.20 मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात 102 केंद्रांमधून कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसींचे लसीकरण करण्यात येत आहे. आजपर्यंत 5 लक्ष 70 हजार 412 नागरिकांना पहिला डोस व 2 लक्ष 8 हजार 930 नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तरी उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रात जावून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालकमंत्री यांनी याप्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत जिल्ह्यात 1 लक्ष 71 हजार 17 लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 1 हजार 130 कोटी रूपये जमा करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा बँकेमार्फत 77 हजार 670 शेतकऱ्यांना 719.28 कोटी रूपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषि निविष्ठा खरेदी करणे सोयीचे झाले. प्रधानमंत्री कृषि पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2020-21 मध्ये जिल्ह्यात सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांपैकी 26 हजार 299 शेतकऱ्यांना 17.92 कोटी रूपयांचा लाभ प्राप्त झाला आहे. तसेच या खरीपात सन 2021-22 अंतर्गत 2 लक्ष 26 हजार 209 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांना थेट बांधावर खते व बियाणे पुरवठा मोहिम राबविण्यात आली. मोहिमेत 1158 शेतकरी गटांनी 27 हजार 483 शेतकऱ्यांना 1 हजार 435 मेट्रीक टन खत व 7 हजार 788 मेट्रीक टन बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्यात आला.
ते पुढे म्हणाले, कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शासनाने माहे मेपासून शिधापत्रीकाधारक कुटूंबातील प्रती व्यक्तीस तीन किलो गहू व दोन किलो मोफत तांदूळ वितरीत केला. तसेचयाकोरोनाच्या संकट काळातगरीब व आर्थिक दुर्बल घटकांना विनामूल्य जिल्ह्यात 17 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून जानेवारीपासून 4 लक्ष 55 हजार शिव भोजन थाळी ‘पॅकींग फुड’ स्वरूपात देण्यात आली आहे. राज्य शासनाने महत्वाकांक्षी रोजगार हमी योजना अधिक व्यापक करण्यासाठी पाहिजे ते काम हे ब्रीद घेवून योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यात 10 हजार 162 शेल्फवरील कामे आहेत. सन 2020-21 मध्ये आतापर्यंत 42 हजार 511 व्यक्तींना रोहयोच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला आहे. पालकमंत्री पांदण रस्ते योजने अंतर्गत जिल्ह्यात 585 किलोमीटर लांबीचे 350 रस्ते पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल सुरक्षीतपणे घरी पोहोचविणे शक्य झाले आहे. कोरोनामुळे आई व वडील दोन्ही मृत्यू पावल्यामुळे जिल्ह्यात 12 बालके अनाथ झाली. त्यांना शासनाच्या बाल संगोपन योजनेतून 5 लक्ष रूपये अर्थसहाय्य मुदत ठेव म्हणून देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात आई किंवा वडील दोन्ही गमावलेली 333 बालके आहेत. या बालकांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा कृती दल कार्यरत आहे.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकासासाठी शासन काम करीत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, सिंदखेड राजा विकास आराखडा, लोणार सरोवर विकास आराखडा तसेच मेहुणा राजा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. मेहुणा राजा येथील संत चोखामेळा जन्म स्थळाचा विकास करण्यात येत आहे. पायाभूत सोयी सुविधा उभारून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निश्चितच या परीसरातील रोजगारात वाढ होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून 15 हजार 388 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. जिगांव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 22 गावांपैकी 6 गावांतील पुनर्वसनाची 18 नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 10 गावांचे पुनर्वसन प्रगतीपथावर आहे. जल जीवन मिशनअंतर्गत 101 पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. लॉकडाऊन काळात कामगारांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे शासनाने 1500 रूपयांचे अर्थसहाय्य नोंदणीकृत बांधकाम कामगारांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यात 52 हजार कामगारांना सदर अर्थसहाय्याचा लाभ देण्यात आला.
प्रतिबंधीत गर्भनिरोधक औषध साठा व विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्यात धडक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातही कारवाई करण्यात आली. कोरोना संसर्ग काळात रेमडेसिव्हीर या औषधाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. या औषधाचा काळाबाजार करणाऱ्या 6 व्यक्तींविरूद्ध अन्न व औषध प्रशासनाने एफआयआर दाखल केले आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व सामाजिक सुरक्षा अंतर नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा उपयोग करावा, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सेनानी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार आदी उपस्थित होते.