Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

संभाव्य तिसऱ्या लाट थोपविण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे-पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक

100 टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करा

बुलडाणा दि.5 : देशात किंवा राज्यात कोविड संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा आहे. मात्र ही लाट केव्हा, कधी व कुठे येईल याबाबत अजून तरी निश्चितता नाही. वैद्यकीय क्षेत्रातील विविध संस्था या लाटेबाबतचा अंदाज व्यक्त करीत आहे. तरी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहावे, अशा सुचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.  कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे आढावा घेताना बोलत होते. याप्रसंगी  जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे आदी उपस्थित होते.

COVIDE19

  तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होण्याच्या शक्यतेच्या दृष्टीने कोविडचे बाल रूग्ण कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, पेडीयाट्रीक वार्ड तयार ठेवावे.  तसेच आज रोजी जिल्हयात 40 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्माण करण्याची तयारी आहे. मात्र 70 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्धतेचे नियोजन करावे. कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता पडू नये. यंत्रणांनी तिसरी लाट येवूच नये, यासाठी प्रयत्न करावे. त्याकरीता जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी यंत्रणांनी सर्वांच्या सहकार्यातून शिबिरांचे आयोजन करावे व 100 टक्के लसीकरण करून घ्यावे. लसीकरणामुळे तिसरी लाट आली, तरी निष्प्रभ ठरेल.  त्यासाठी विहीत कालमर्यादेत एक धडक कार्यक्रम जिल्ह्यात राबवावा.  चाचण्यांसाठी लागणाऱ्या विविध किटची पर्याप्त व्यवसथाही आतापासून करून ठेवावी.

  पेडीयाट्रीक वार्ड सज्ज : स्त्री रूग्णालय बुलडाणा येथे  50 बेड, उपजिल्हा रूग्णालय, शेगाव येथे 50 बेड, सामान्य रूग्णालय खामगांव येथे 50 बेड, दे. राजा येथे 50 बेड व प्रत्येक ग्रामीण रूग्णालयात 10 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.    

Leave A Reply

Your email address will not be published.