शेतकरी कार्डाचे धान्य बंद केल्याच्या विरोधात ‘पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी’ बुलढाण्यातून छेडणार आंदोलन
चिखली – २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी सुरू केलेली शेतकरी लाभ योजना सुरू केली होती. या अंतर्गत दिले जाणारे धान्य शिंदे फडणवीस सरकारने सत्तेवर येतात तातडीने बंद केल्याने गोरगरीब शेतकऱ्यांना रेशनच्या गहू तांदुळापासून वंचित ठेवले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात रेशन बचाव समिती महाराष्ट्र राज्य व स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी बुलढाणा येथे प्रचंड मोठा मोर्चा आयोजित केला आहे. सदर मोर्चाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू व स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी हे करणार आहेत.
अतिवृष्टीमुळे झालेले पिकाचे नुकसान शेतमालाच्या भावातील मंदी, विमा कंपन्यांनी लावलेला खेळ खंडोबा या सर्वांनी शेतकरी त्रस्त असताना सरकारने शेतकरी लाभ योजनेतील धान्य बंद करून गोरगरीब शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.सरकारने सुरूवातीला फक्त गहू बंद केला आणि नंतर नोव्हेंबर महिन्यापासून तांदूळ ही बंद केले.
सदर निर्णयाने ग्रामीण भागात शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. परंतु कुठल्याही गोष्टीसाठी जोपर्यंत सामूहिक प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत त्या अन्यायाला वाचा फुटत नसते, ही बाब स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी व जनरल सेक्रेटरी विश्वंभर बसू त्यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा प्रल्हाद मोदी यांनी बुलढाण्यातून सदर आंदोलनाला सुरुवात करून महाराष्ट्रातील मराठवाडा- विदर्भातील 14 जिल्ह्या मधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील रेशन बचाव समितीचे सदस्य तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकरी लाभार्थ्यांचे धान्य बंद झाले आहे असे शेतकरी लाभार्थी या मोर्चासाठी एकत्र येणार आहेत.
सदर मोर्चाला प्रल्हाद मोदी, मोर्चासाठी खास करून कलकत्त्याहून येणारे विश्वंभर बसू, कॉम्रेड एन डी पाटील, राजेश आंबुसकर इत्यादी संघटनेचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तर जिल्ह्यातील सर्वच सन्माननीय आमदारांना संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे सुद्धा सदर मोर्चा मध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
ज्या ज्या शेतकरी लाभार्थ्यांचे धान्य बंद झालेले आहे अशा शेतकरी लाभार्थी योजनेच्या शेतकऱ्यांनी सदर मोर्चामध्ये सहभागी होऊन आपले धान्य बंद का केले या संदर्भात तक्रार त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना या मोर्चाच्या निमित्ताने द्यायची आहे. यासाठी जिल्हाभरातील शेतकरी लाभ योजनेत बंद झाल्याने ज्या ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने राजीव जावळे यांनी केले आहे