बुलडाणा दि.2 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पूर्ण जिल्हयामध्ये पॅनल ठेवण्यात आली होती. या लोक न्यायालयात प्रत्यक्ष व आभासी अशा दोन्ही प्रकारे प्रकरणे ठेवण्यात आली. त्यात प्रलंबीत एकुण 4204 प्रकरणे तडजोडीसाठी ज्यामध्ये प्रामुख्याने तडजोडी योग्य अशी फौजदारी व दिवाणी, मोटार वाहन अपघात प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, छोटे गुन्हे, भुसंपादनाची प्रकरणे तसेच कौटुंबिक दावे आदी ठेवण्यात आले. त्याबरोबरच जे दावे अद्याप दाखल झालेले नाहीत, असे दाखलपुर्व प्रकरणे एकुण 13393 प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी प्रलंबित 1132 प्रकरणे आणि वादपुर्व खटले 5978 असे एकुण 7110 एवढे प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधूपन न्यायालयीन शुल्क 20 कोटी 40 लक्ष 90 हजार 751 रूपये जमा करण्यात आले.
बुलडाणा येथे एकुण 8 पॅनल तयार करण्यात आले होते. त्यामध्ये तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 आर.बी.रेहपाडे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती एस.एस. पडोळीकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए.यु.सुपेकर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ए.ए.देशपांडे, तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ए.बी.इंगोले, दुसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एन.बी.चव्हाण, चवथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी.डब्लु. जाधव आणि मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एस.भुरे यांचा समावेश होता. ही लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा प्र. अध्यक्ष श्रीमती चित्रा हंकारे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. त्यांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीत निकाली काढण्याकरीता वकील संघाला आवाहन केले होते.
या लोक अदालतीसाठी सर्व सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव साजिद आरिफ सैय्यद, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विजय सावळे, सचिव अमर इंगळे तसेच इतर सर्व विधीज्ञ आणि पक्षकार मोठया संख्येने हजर होते. या लोक अदालती करीता पंच म्हणुन वकील संघाच्या सभासदांनी काम पाहिले. ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपीक शांतीकुमार सुभाषचंद्र महाजन, गजानन प्रकाश मानमोडे, हेमंत आबाराव देशमुख, व्ही.एस.मिलके, ए.ए.लहाने, लिपीक आकाश भगवान अवचार, पी.एल.व्ही. प्रविण खर्चे, विधीज्ञ सुबोध तायडे यांनी प्रयत्न केले. लोक अदालतीत कोवीड-19 च्या नियमांचे पालन करून मास्क लावुन, सामाजीक दुरी ठेवुन व इतर सर्व काळजी घेवुन जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.