Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

घाट नसलेल्या ठिकाणाहून रेती उपसा सुरुच वरिष्ठ घेणार का दखल ? हा कोडगेपणाचा कळस झाल्याची चर्चा

RETIGHAT

सिंदखेडराजा:- घाट नसलेल्या ठिकाणाहून अखंड रेती उपसा व वाहतूक सातत्याने सुरुच आहे. त्यासाठी फक्त मार्ग बदलून वाहतुकीचा प्रकार संगन्मतातून दिसून येत आहे. यामुळे शासकीय यंत्रणेचा फोलपणा व कोडगेपणा व आतून लागेबांधे असल्याचे चित्र तसेच सदरीलप्रकार परिसरातील चर्चेतून रेखांकित होत आहे.
शासकीय लिलाव होऊन सिंदखेड राजा तालुक्यात साठेगाव, हिवरखेड व तढेगाव ह्या तीन ठिकाणी अधिकृत रेती घाट आहे. त्या ठिकाणाहून रेतीउपसा व वाहतूक सुरु आहे. याचाच गैरफायदा घेऊन तालुक्यातील लिंगा, पिंपळगाव कुडा, जऊळका, दुसरबीड, ताडशिवणी, राहेरी आदि इतरही अनेक ठिकाणांहून अखंड रेती उपसा व वाहतूक करणारी समान यंत्रणा धडाक्यात सुरु आहे. यासंदर्भात काही वृत्तपत्रांमध्ये याविषयावर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर हे अवैध प्रकार बंद होतील अशी अपेक्षा होती. मात्र तरीही रेतीचा अवैध उपसा व वाहतूक नित्यनेमाने अखंड सुरुच असल्याची महसूल यंत्रणेमधील फोलपणा दर्शविणारी बाब दिसून येत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता ताडशिवणी येथील खडकपूर्णा नदीतील कोल्हापुरी बंधाऱ्याला लागून असलेल्या पात्रातील जऊळका ते दुसरबीड परिसरातील रेती उपसा रोजच सर्रास करुन वाहतूक करण्यात येते आहे . फक्त रेती वाहतुकीचा मार्ग बदलला असल्याचा प्रकार सुरुच आहे.
ह्या प्रकारांसंदर्भात सिंदखेड राजा चे तहसीलदार सुनील सावंत यांना एका जबाबदार व्यक्तीने वेळोवेळी संपर्क साधून माहिती दिली असता तलाठी पाठवतो एवढे एकच सांगितल्या जाते. त्यानंतर तलाठी त्या ठिकाणी जाऊन हा सर्व प्रकार डोळ्यांनी पाहूनसुद्धा कोणतीच कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. त्यावेळी नदीकाठावरच्या परिसरातील शेतकऱ्यांनी या विषयी विचारपूस केली असता , आपण प्रभारी तलाठी असल्याने कारवाई करण्यात येत नाही असे गुळमुळीत उत्तर त्यांना देण्यात येते.
ह्याच दरम्यान रेती उपसा करणारे काहीजण शेतकऱ्यांच्या माघारी काठावरील शेतांमध्ये मोकळ्या जागेत रेतीचा साठा करुन ठेवत आहेत. यासंदर्भात तहसीलदार सुनील सावंत यांना माहिती दिली असता, या प्रकरणात कोणताही दोष नसतांना ज्या शेतात साठे आहेत, त्या शेतकऱ्यांवरच कारवाई करण्याची भाषा बोलतात. यातून देवाणघेवाणीतून “चोराला सोडून संन्याशाला फाशी” असा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर याचवेळी ह्यासर्व प्रकारांचा अहवाल तहसीलदार यांना दिला असूनही त्यावर कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याची खंत यंत्रणेतील एकाने बोलून दाखवली आहे.
या सर्व प्रकारातून फक्त देवाणघेवाणीसाठी सर्व काही प्रकार उघड होत आहे.त्यामुळे तालुका व उपविभागीय यंत्रणेवर कुणीही किती भरवसा ठेवायचा ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यावर वरिष्ठ स्तरावरुन उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे, हे एवढे मात्र निश्चित ..!

Leave A Reply

Your email address will not be published.