Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ योजनेतून होणार वृक्ष लागवड-विविध प्रसंगाच्या औचित्यातून साधरणार वृक्षलागवड

बुलडाणा दि.24 : वृक्षलागवडीच्या माध्यमातून सध्या उद्भवणाऱ्या विविध पर्यावरणीय समस्या सोडवून आपले पर्यावरण अधिक समृध्द बनविण्यासाठी राज्य शासनाकडून वृक्षलागवडीच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांचे लोकचळवळीत रुपांतर होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटक, व्यक्ती,  कुटूंब यांना वृक्षलागवडीत सहभागी करुन घेण्यात येत आहे. त्याकरिता शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे.

tree

   पुणे जिल्ह्यातील रानमळा, ता. खेड (राजगुरुनगर) या गावातील ग्रामस्थांकडून जन्म, विवाह, मृत्यू अशा अविस्मरणीय प्रसंगांच्या निमित्ताने लोकसभागातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतला जातो. जन्म, विवाह आणि मृत्यू या प्रसंगाच्या निमित्ताने प्रत्येक कुटूंबातील घरच्या आजुबाजूला मोकळ्या जागेत, परसबागेत किंवा शेतीच्या बांधावर फळझाडांची रोपे लावून आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण दीर्घकाळासाठी जपली जाते. अशा उपक्रमातून रानमळा हे गाव हिरवेगार आणि पर्यावरण समृध्द होण्यास मोठा हातभार लागला आहे. या वृक्षलागवडीतून गावातील कुटूंबांना कायमस्वरुपी उत्पादनाचे साधन निर्माण झाले आहे. या रानमळा गावाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागासाठी योजना जाहीर केली आहे. त्या बाबतचे दोन स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित केले आहेत.

   सदरची योजना व्यापक व विस्तृत प्रमाणावर राबविल्यास राज्यातील वृक्षच्छादन वाढण्यास निश्चित मदत होईल, या योजनेअंर्तगत ग्रामीण भागासाठी शासन निर्णय ग्राम विकास विभागाकडून दि.16 मार्च 2018 निर्गमित करण्यात आला आहे. शहरी भागासाठी शासन निर्णय नगर विकास विभागाकडून दि. 1 मार्च 2018 निर्गमित करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत जन्म, विवाह, परिक्षेतील यश, नोकरी मिळणे, मृत्यू अशा प्रसंगाचे औचित्य साधून जन्म वृक्ष, शुभमंगल वृक्ष, माहेरची झाडी, आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष, अशी वृक्षलागवड करण्यात येते.  तसेच वर्षभरात गावात जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत संबंधित कुटूंबाला फळझाडांची रोपे देऊन करण्यात येते. या झाडांना आपल्या बाळाप्रमाणे जीव लावून संवर्धन करणे अपेक्षित आहे. अशा वृक्षांना शुभेच्छा वृक्ष गणल्या जाणार आहे. दरवर्षी गावात विवाह होणाऱ्या तरूणांस फळझाडांची रोप देवून शुभाशीर्वाद प्रसंगी शुभमंगल वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी गावातील दहावी व बारावीची परीक्षा उर्तीण होणाऱ्या, गावातील नोकरी मिळवणाऱ्या तरुण-तरुणींना आणि गावातील विविध निवडणूकांमध्ये विजयी होणाऱ्या उमेदवारांना अशा आनंदाच्या क्षणी फळझांडाची रोपे देऊन पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी आनंद वृक्ष लावण्यात येणार आहे.  माहेरची झाडी प्रकारातून गावातील ज्या कन्यांचे विवाह वर्षभरात होतात अशा सासरी गेलेल्या विवाहीत कन्यांच्या माहेरच्या लोकांना फळझांडाची रोपे देऊन त्या झाडांचे संबंधित कुटूंबाने संगोपन करणे अपेक्षित आहे. तसेच स्मृती वृक्ष प्रकारात एखाद्या गावामध्ये ज्या व्यक्तीचे वर्षभरामध्ये निधन होते, त्या कुटूंबाला फळझाडांचे रोपे देऊन श्रध्दाजंली अर्पण करण्यात येते. सदर कुटूंबाने झाडाच्या रुपाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतींचे जतन करणे अपेक्षित आहे.

   मागील एक वर्षातील अशा अविस्मरणीय घटनांप्रित्यर्थ करावयाच्या वृक्षलागवडीसाठी लागणाऱ्या रोपांची माहिती दि 30 जुन पर्यत संकलित करुन ग्रामपंचायतींनी तसेच नगरपरिषद नगरपंचायतींनी लागणाऱ्या रोपांचे दि. 1 जुलै रोजी वर्षातून एकदाच वाटप कराचे आहे. योजनेसाठी वन, सामाजिक वनीकरण आणि एफडीसीएम या विभागाकडून वनमहोत्सव कालावधीत सवलतीच्या दराने रोपे उपलब्ध करुन दिली जाते. सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपे उपलब्ध करुन घेण्यासाठी आपल्‍या तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.