आज पर्यंत अनेक साथी आल्या नि गेल्या.
काही मुक्कामी राहून हळूहळू लोकांच्या अंगवळणी पडल्या.कुठलीही नवी साथ अफवांच्या लाटे सोबत घेऊन येते..
वाऱ्याच्या वेगाने पसरणारी….मृत्युच्या भितीची साथ..
प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा
ऍपमीडिया.अफवांना नवनवीन पाय देणारे मोबाईलचे जाळे आणि बोटांचे चाळे. सेकंदाला हजार किमी वेगाच्या अफवा.
सोफ्या वरून हालू न देणारे चॅनल्स..
काल्पनिक कथा,पटकथा,साजेसं संगीत “मृत्युचे थैमान”..”कोरोनाचा कहर” टीव्ही च्या पडद्यावर शब्दांचं तांडव…
सबसे पहले…. सबसे तेज Breaking news..
अतिरंजित बातम्या.. जवळजवळ अफवाच.
मृत्युच्या भिती साठी पोषक माहोल..
संसर्गा आधीच सकल समाजमन मरणाच्या कल्पनेनेच गंभीर आजारी..कानात घुमणाऱ्या बातम्यां,वाढलेलं टेंन्शन आणि निद्रानाश…
वेलकम जिंदगी
भिती.. एक नैसर्गिक भावना..
एक दिवसाच्या बाळाला पण असते…. पडण्याची भिती… हळूहळू ती कमी होते.
बालकाचं साॅफ्टवेअर इन्स्टिंक्ट वर चालणारं .. त्यात भिती, मरण नावाच्या फाईल्सच नसतात.इतरांच्या डोक्यातल्या व्हायरसमुळे हे साॅफ्टवेअर लौकरच करप्ट होत जातं.चेतन मनाकडून सुप्त मनाकडे जंक फायलींचं काॅपी पेस्ट.
दीड लाखांपेक्षा जास्त नकारात्मक वाक्ये ऐकत तरूण होणारं बालपण.. .
झुरळ,पाल,उंदीर,अंधार यांच्या रांगेतच डॉक्टर,पोलिस,गुरखा आणि देव..सगळ्यांचा परिचय दहशतीच्या माध्यमातून.
“ऐकलं नाहीस तर देवबाप्पा तुला शिक्षा करेल” ….”बरं झालं बाप्पाने शिक्षा दिली”
दंगा मस्ती करताना खरचटण्यापासून हाड मोडेपर्यंतच्या शिक्षा देवानेच केलेल्या.
खरं तर देव ही संकल्पना किती सकारात्मक
“अणुरेणिया थोकडा,
तुका आकाशाएवढा”
सुक्ष्मातीसुक्ष जीवापासून ते अवकाश व्यापणाऱ्या चैतन्यापर्यंतचं अस्तित्व.
उन पाउस,थंडी वारा,दिवस रात्र यांची गणितं सांभाळणं.
पंचमहाभूतांना सोबत घेऊन ज्ञात अज्ञात गृह मालिकेला दावणीला बांधून एकाच परिघात फिरवत ठेवणं.
या घटना दैवि म्हणा किंवा भौतिक.अगणीत जीवांच्या कल्याणा साठीच घडतात.
जन्म आणि मृत्यू या दोन तारखांमधील संख्यात्मक श्वास आणि गुणात्मक आयुष्य नियतीनेच ठरवलेलं…..
“शरीर मर्त्य आहे आत्मा अमर आहे”.
भगवी,पांढरी,हिरवी वस्त्रं पांघरलेल्या गुरूंच्या सत्संगातून कानावर पडलेल्या ऋचा.
तरीही निकटच्या परिघातील प्रत्येक मृत्यू त्याला स्वत:च्या मृत्यू जवळ घेऊन जातो.
भितीचं मळभ वाढत राहतं. सोबतीला वयानुसार वाढलेलं भितीचं गाठोडं. झाकलेले साक्षर डोळे आणि वारा नेईल त्या दिशेला धावणारं आंधळं मन.रोज थोडं थोडं मरत… जगणं विसरलेला प्रवास..
मग सुरु होतो आपल्या भितीच्या भांडवलावर जागतिक धंदा. वयाच्या तिशीतच कुबेर झालेले मीडियाचे मालक. हातात जाहिरातींचे फलक घेऊन प्रत्येक चॅनल च्या कट्टयावर गंडवायला उभे…
साथीत मेलेल्या प्रत्येक देहाचा वाहिन्यांनी केलेला जाहिराती लिलाव.
मरणाची भिती आणि TRP ची स्थिती दोन्ही वाढल्या की सेकंदाची किंमत लाखो रुपये…
बातम्या ३० सेकंदाच्या आणि जाहिराती तीन मिनिटांच्या…
गंडादोरे ताईत पासून ग्रहांकित खड्यांपर्यंत,
जडीबुटी काढ्यापासून महागड्या टाॅनिक पर्यंत..
काॅर्पोरेट हास्पिटल पासून ते पंचतारांकित देवालयापर्यंत पर्यंत…
दंत मंजनापासून ते हृदय भंजना च्या तेलापर्यंत ….
राखेने हात धुवून जगलेल्या पिढीलाही सॅनिटायझरचे थेंब विकणाऱ्या रंभा,उर्वशी आणि १० रुपयाच्या साबणाने सुंदर झालेल्या तारका..
जीवनावश्यक आणि जीवरक्षक वस्तूंचा महासेल..
मृत्यू …जगातील एकमेव अटळ वास्तव.
त्याचं स्टेशन टाळण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी… यमाच्या यादीत नाव असेल तर.. ठरलेल्या वेळी ….ठरलेल्या जागी …. येणार म्हणजे येणारच…
कंस मामाला भाच्याकडून आणि परिक्षित राजाला सापा कडून … कडेकोट बंदोबस्तातही यमाने गाठलच….
कोरोना पासून पळणाऱ्या कित्येकांना मोकळ्या हायवे वर तर काहींना रेल्वेच्या रूळावर त्याने गाठलंच….
देवीचा महिमा,अहं ब्रम्हास्मि,अल्ला हो अकबर,जिझस द सेवियर च्या पलिकडचा काळाचा महिमा…
वैद्यकीय चमत्काराला तर लाॅजीकच नाही..
नव्वदीचे रुग्ण जीवघेण्या आजारातून घरी जाताना अन् पंचविशीतील आत्मे किरकोळ आजारांनी देह सोडताना पाहिले.
शेवटच्या टप्प्यात गॅरंटी संपलेल्या कॅन्सर रुग्णांना अनेक वर्षं जगताना पाहिलंय.
बाटलीतल्या दारूने
सहा पदरी हाय वे ने
हृदयाच्या झटक्याने
बंदूकीच्या खटक्याने
कोरोनापेक्षा दसपट लोकं मरताना पाहिलंय.
कोरोना तसा कनवाळू.. डार्विन चा चेला.. Survival of the fittest च्या नियमाने वागणारा…
जेमतेम ५ टक्के बाधितांना घेऊन जाणारा..
त्यातही जीवनाला कंटाळलेल्या जेष्ठांना.. मोकळ्या करतोय बागा शुद्ध करतोय जागा खेळण्यासाठी ….नातवंडांना.
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।
किती तरी वर्षांनी कोकिळेच्या कुहुने जाग आली, बाहेर सोसायटीतील बहावा आणि गुलमोहोर हळद कुंकू उधळत होते…
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ।।
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ।।
तुकोबा… माफ कर ….लाज वाटते रे आम्हाला आमच्या अहंकाराची…
तुझ्या ओव्यांचा अर्थ एका विषाणू ने समजावला.
धर्मा पलिकडचं अध्यात्म,
देवळा बाहेरचे देव
माणूसकीची नागडी रुपं
आणि क्षणभंगुर आयुष्याचा डेमोच दाखवला कोरोनाने…..
कोरोना….ऑक्सिजन सोबत आपल्या हवेचा भाग झालाय आता…त्याला गाळून घ्या, गिळून घ्या किंवा त्याच्याशी जूळवून घ्या..
भूतकाळ पुन्हा येणार नाही.भविष्यकाळ आपला असेल का माहित नाही. दोन्ही पाय वर्तमानाच्या सात बारा वर घट्ट रोवून
पिकवलेल्या सुखाचा आस्वाद घ्या.आनंदाचा कोटा वापरत रहा…. भविष्यात त्याच्यावर व्याज मिळणार नाही…
आज ना उद्या कोरोना जाईल पण कोविड १९ ची अपडेटेड आवृत्ती पुन्हा येईल.
ऐहिक विश्वाला अध्यात्म शिकवायला…..
हृदयाचे ठोके आणि श्वासांची उब जाणवते तो क्षण आपला.
त्या क्षणांसाठी घरातील देवाला हात जोडा… नशिबात लिहिलेल्या प्रत्येक श्वासाचा प्राणायाम करा. अनुलोमासोबत जगण्याची लय आत घ्या. विलोमासोबत मृत्युचं भय बाहेर जाऊ द्या. आणी कृतज्ञतेने शांत झोपा.
उद्या सकाळी जीवंत उठलात तर निळ्याशार आकाशाला कवेत घेऊन भयमुक्त मनाने जोरात म्हणा …
“वेलकम जिंदगी….. गले लगाले”