किनगावराजा आनंद राजे(प्रतिनिधी) गत ४ दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे किनगावराजा परिसरातील खरिपातील सर्वच पिके संकटात आली असून कायमच आशावादी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडी ‘आता सगळंच आटपलं’ अशी नैराश्याची भावना असणारी वाक्य ऐकायला मिळत आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या भीतीचे सावट झुगारत पेरणीसाठी कर्जबाजारी होऊन तसेच जवळील पैसा अडका खर्च करून जीवाचे रान करणाऱ्या येथील शेतकऱ्यांचे मागील चार दिवसांपासून सतत बरसनाऱ्या वरूनराजाने रौद्ररूप धारण केल्यापासून धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.येथील शेतकऱ्यांनी अगोदरच दुबार-तिबार पेरणी करून बसल्यामुळे त्यांची खास आशा सोयाबीन व कपाशीवरच होती.मध्यंतरी १५ दिवसांपूर्वी पावसाने उघडीप दिल्यामुळे महागाची औषधे आणून सोयाबीन तसेच कपाशीवर फवारणी केली होती.त्यामुळे पिकांची परिस्थिती समाधानकारक दिसत होती.येत्या ८ ते १० दिवसात जवळपास ६० ते ७० टक्के सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरामध्ये येण्याची शक्यताही वाटत होती परंतु पावसामुळे उभ्या सोयाबीनला कोंब येत असल्याचे दिसत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेलाही सुरुंग लागलेला दिसून येत आहे.
या परिसरातील कपाशी पिकाचीही स्थिती याहून वेगळी नाही सद्यस्थितीत कपाशी झाडाच्या खोडालगतची पक्की झालेली बोंडे शेतात पाणी साचल्यामुळे सडून चालली आहे.वजनदार असणारी व उत्पन्नात वाढ आणणारी ही बोंडे सडून गेली तर कपाशीच्या उत्पन्नात जवळपास ५० टक्के घट होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
एकंदरीतच सतत चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे किनगावराजा परिसरातील शेतकऱ्यांचे जनजीवन प्रभावित झाले असून हाती आलेले सोयाबीन व कपाशी पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला दिसून येत आहे.
प्रतिक्रिया :- जूनच्या सुरुवातीस पाऊस नसल्यामुळे सोयाबीन पेरणी कपाशी लागवडीस उशीर नको म्हणून कोरड्यात पेरणी व लागवड केली.मध्यंतरी पाऊस बरा पडल्याने सर्वकाही सुरळीत होते.परंतु सोयाबीनच्या ऐन काढणीच्या वेळेतच सतत पाऊस सुरु झाल्यामुळे आता हाती काहीच लागण्याची शक्यता नाही.