Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कापुस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.2 : जिल्हयात नगदी पिक म्हणून कापूस पिक हे मोठया प्रमाणात घेतले जाते. या हंगामात देखील मोठया प्रमाणात कापूस पिकांची लागवड केलेली आहे. कापूस पिकाची पेरणी ही जूनमध्ये सुरू होते. पिक सध्या वाढीच्या व पातीच्या अवस्थेत आहे. सन 2015 पासूनचा अनुभव बघता व सध्या वातावरणात असलेली आर्द्रता, सतत ढगाळ वातावरण यामुळे सध्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव  येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता वेळेतच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.  

cotton

   शेताचे सर्वेक्षण करून बोंडअळीग्रस्त डोमकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात, कपाशीच्या शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी किमान दहा पक्षीथांबे लावावे म्हणजे पक्षी त्यावर बसून अळ्या टिपून खातील. पतंगाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याकरीता पेरणीच्या 45 दिवसानंतर हेक्टरी 5 यप्रमाणे कामगंध सापळे लावावे. किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर म्हणजे 8 ते 10 पतंग प्रति कामगंध सापळा प्रति दिन सलग 3 दिवस किंवा प्रति 10 फुले किंवा 10 हिरवी बोंडे सापडल्यास शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा ॲझाडिरेक्टीन 10 हजार पीपीएम 1 मिली प्रति लिटर किंवा 1500 पीपीएम 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंदरी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी लेबलक्लेम किटकनाशकांची शिफारसीत मात्रेत तक्यात नमूद केल्यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवाणी करावी. प्रत्येक फवारणीच्यावेळी एकच एक किटकनाशक न वापरता आलटून पालटून वापरावे. निंबोळी अर्क 5 टक्के मात्रा प्रति 10 लीटर पाण्यात 50 मिली, क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 मिली किंवा 20 ग्रॅम, क्लोरोपायरीफॉस 20 टक्के ईसी किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यूपी 25 मिली किंवा 20 ग्रॅम, फेनवेलरेट 20 टक्के ईसी किंवा सायपरमेथ्रीन 20 टक्के ईसी 10 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकाचा कालावधी वाढविणारी किटकनाशके मोनोक्रोटोफॉस, ॲसिफेट, इमिडाक्लोप्रिड,  थायोमेथोक्साम आणि ॲसिटामिप्रिड आदींचा वापर सुरूवातीच्या तीन महिन्यांमध्ये टाळावा.

   ज्या ठिकाणी उपलब्धता असेल तिथे बिव्हेरीया बॅसरयाना, मेटॅरीझियम ॲनोसोपीली किंवा व्हर्टिसीलीयम लेकॅनी 1.5 टक्के विद्राव्य घटक असलेली भुकटी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वातावरणात आर्द्रता असताना फवारणी करावी. विशेषत: पहिल्या तीन महिन्यात वनस्पतीजन्य जैविक किडनाशके आणि जैविक किड नियंत्रण पद्धतीचा समावेश असलेल्या एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. पिक उगवल्यानंतर 115 दिवसांनी ट्रायकोग्रामा बैक्ट्री अथवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी किटकांची 1.5 लक्ष अंडी प्रती हेक्टरया प्रमाणात प्रसारण करावे. पांढरी माशी व बोंडअळ्यांचा उद्रेक टाळण्यासाठी किडनाशक मिश्रणाचा वापर कटाक्षाने करावा. नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही प्रकारच्या सिंथेटीक पायारेथ्रोइड, ॲसिफेट, फिप्रोनिल किटकनाशकांचा वापर करू नये. तरी शेंदरी बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणाकरीता आतापासूनच पिक सर्वेक्षण करून भौतिक, जैविक व रासायनिक किड नियंत्रण पद्धतीचा वापर करून एकात्मिक किड नियंत्रणक प्रभावीपणे करावे,असे आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.