बुलडाणा दि.16 : नाफेडच्यावतीने हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. हरभरा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची 15 फेब्रुवारी ते 17 मे 2021 पर्यंत नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी होऊ न शकली नाही. शासनाने 8 जुन ते 18 जुन 2021 पर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्यांची हरभरा विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यात मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार नोंदणीचे कामकाज सुरू असून खरेदीही सुरळीत सुरू आहे.
ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती. अशा सर्व 17 हजार 421 शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस देण्यात आलेले आहे. मात्र बाजारपेठेतील दर जास्त असल्यामुळे 25 मे 2021 पर्यंत हमीदराने 78 हजार 714 क्विंटल हरभरा शेतमालाची 4 हजार 499 शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली होती. नंतर शासनाने 25 जुन 2021 पर्यंत शेतकऱ्यांची खरेदी करण्यासाठी मुदतवाढ दिल्याने परत खरेदीस सुरूवात करण्यात आली. मात्र मध्यंतरीच्या काळात हमीदरापेक्षा जास्त दर मार्केटमध्ये असल्याने महिनाभर शेतकरी हमी दराचे केंद्रावर माल विक्रीसाठी आले नाही. सद्यस्थितीत बाजारपेठेतील दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी परत हमीदर केंद्राकडे विक्रीसाठी माल आणावयास सुरूवात केली आहे. त्यासाठी आवश्यक असणारा बारदानासुद्धा केंद्रावर पुरवठा करण्यात आलेला असून खरेदी केंद्र सुरळीत सुरू झाले आहेत. लॉकडाऊनमुळे बारदाना मिळण्यास थोडा उशिर होत आहे. मात्र जसजसा बारदाना प्राप्त होईल. त्याप्रमाणे खरेदी केंद्र 25 जुन 2021 पर्यंत सुरूच राहणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.