सिंदखेड राजा प्रतिनिधी – काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सवडद ते गजरखेड मार्गावरच्या नाल्यावर असलेला रपटा वाहून गेला आहे. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबण्याची शक्यता आहे.
सवडद येथून गजरखेडकडे जाण्यासाठी मार्ग आहे. त्या मार्गावर गावापासून थोड्या अंतरावर नाला असून, ओलांडण्यासाठी तेथे रपटा टाकण्यात आला आहे. पलीकडील भागात सुमारे ३५० एकर शेती असून त्यावर ३०० कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. काल दि. १५ जून, मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाहले. त्या प्रवाहात रपट्याच्या वरचा भाग वाहून गेला आहे. सध्या पेरणीचे दिवस असून काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागतही सुरु होती. रपटा वाहून गेल्यामुळे मशागतीची कामे खोळंबून नंतरच्या पेरणी संदर्भात शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे.
सरपंच शिवाजी लहाने, तेजराव बाप्पू देशमुख, विनोद देशमुख आदिंनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच यापूर्वी सुद्धा काहीवेळा रपटा वाहून गेल्याचे प्रसंग घडले असल्याचे सांगितले आहे. तर दरवर्षी रपट्याची डागडुजी करण्यात येत असल्याने एकदाच मजबूत असा कायमचा पूल उभारून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
Related Posts