श्रीं’च्या आगमनाने किनगावराजात जमली भक्तांची मांदियाळी (फोटो)
किनगावराजा दि.२७(प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे तब्बल २ वर्ष येऊ न शकलेल्या विदर्भातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखी दिंडीचे किनगावराजात आगमन झाल्यामुळे ‘श्रीं’च्या भक्तांची मांदियाळी जमल्याचे दिसून आले.
सुमारे सातशे वारकऱ्यांच्या उपस्थितीत ‘श्रीं’च्या पालखीचे सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथे आगमन झाले.दिंडीच्या दर्शनी भक्तिगीतांनी सज्ज असा ‘श्रीं’च्या संस्थानचा ब्रासबँड, त्याच्या तालावर नृत्यनिपुन अश्व,सूर सनईचा मंगलमय स्वर,टाळमृदंगाच्या गजरात संतांच्या अभंगावर विलोभनीय पावली खेळणारे वारकरी व मधोमध ‘श्रीं’चा पंचधातूंचा मुखवटा असणाऱ्या पालखीचे आगमन येथील पोलीस स्टेशनमध्ये झाले.यावेळी सर्वप्रथम किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार युवराज रबडे यांच्या हस्ते ‘श्रीं’चे सपत्नीक मानाचे पूजन करण्यात आले.आरती झाल्यानंतर पालखी स्थानापंन्न झाल्यावर पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी यावेळी ‘श्रीं’चे दर्शन घेतले.
दिंडीसोबत आलेल्या वारकऱ्यांना तसेच दर्शनासाठी जमलेल्या हजारो भाविकांना येथील व्यापारी नवीन कोटेचा,बालू केवट,विनोद हरकळ,संतोष शिंदे,प्रकाश शिंदे,ज्ञानेश्वर केवट व भरत हरकळ यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.दोन वर्षानंतर ‘श्रीं’च्या पालखीचे आगमन झाल्यामुळे किनगावराजास यात्रेचे स्वरूप आले होते.दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ‘श्रीं’च्या पालखीचे बीबी येथे मुक्कामासाठी प्रस्थान झाले.