किनगावराजा दि.२६ (प्रतिनिधी) परिस्थिती कितीही प्रतिकूल असो परंतु त्यावर मात देऊन ती परिस्थिती बदलविण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये असते तीच व्यक्ती यशोशिखरावर जाते असे प्रतिपादन नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत पाठक गुरुजी यांनी केले.किनगावराजा येथील भूमिपुत्र डॉ.पवन राजे यांची येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली यावेळी घेतलेल्या त्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
शिक्षण घेत असतांना बऱ्याच विद्यार्थ्यांना कुटुंबाच्या आर्थिक समस्येमुळे संकटांचा सामना करावा लागतो परंतु जिद्द आणि सातत्य ठेवल्यास आपोआप मार्ग निघतो असे मनोगतही प्रा.पाठक यांनी यावेळी व्यक्त केले.याठिकाणी उपस्थित माजी प्राचार्य बलवंत विचारे सर यांनी ‘खुद ही को कर बुलंद इतना की खुदा बंदे से पुछे बता तेरी रजा क्या हैं’ असा उल्लेख करून शिक्षण घेत असतांना समस्या कितीही निर्माण झाल्या तरी स्वतःलाच इतके सक्षम बनवा की यशालाही तुमच्या पायावर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय असणार नाही असे मार्गदर्शन केले.
सत्काराला उत्तर देतांना डॉ.पवन राजे यांनी मिळालेल्या यशाचे श्रेय वडील जितेंद्र राजे,आई संगिता राजे,आजी सुंदराबाई राजे,मामा प्रेमानंद महाराज देशमुख यांना तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे प्रा.गोपाल राजे,डॉ.अभिजित नरसिंग राजे तसेच गुरुजनांना दिले.
येथील व्यापारी सुभाष घिके,प्रा.ज्ञानेश राजे,यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी किनगावराजा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.संजीवनी कायंदे,ग्रा.पं. सदस्य सखाराम हरकळ,दीपक पडुळकर, दत्तात्रय झोरे, शिवाजीराव काळुसे गुरुजी,डॉ.अरविंद जाधव,विलास निंबेकर,स्थानिक आरोग्य समितीचे सल्लागार प्रसाद कुलकर्णी,रवी काळुसे,रमेश वगदे,नवीन कोटेचा, अनिल भांगडीया आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अविनाश राजे,सूत्रसंचालन विष्णू मांटे व आभार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Related Posts