Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

बेपत्ता झालेल्या त्या शेतकऱ्याचा मृतदेह पेनटाकळी तलावाच्या पाण्यात आढळला पोलिसांसमोर अज्ञात आरोपींनी उभे केले आव्हान

सिंदखेडराजा (सचिन मांटे) :- पीक विम्याची तुमची कागदपत्रे कमी आहेत , असे अज्ञात व्यक्तीने मोबाईल फोन करून सांगत सिंदखेड राजा तालुक्यातील रुम्हणा येथील ५३ वर्षीय शेतकऱ्याला ३१ मे, सोमवारी एका फाट्यावर बोलावले . त्यानंतर तो शेतकरी बेपत्ता झाला होता. त्या दिवसापासून किनगावराजा पोलिस या बेपत्ता प्रकरणाचा तपास करीत होते. दरम्यान काल दि. ३ जून, शुक्रवारी दुपारी पेनटाकळी तलावात त्या बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने अमडापूर पोलिसांत खून करुन पुरावा नष्ट करणे प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ह्या सर्व घटनाक्रमामुळे बेपत्ता प्रकरणाचे गूढ वाढत चालले असून अज्ञात आरोपींनी पोलिसांपुढे प्रकरण सोडवण्याचे आव्हान उभे केले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

RANGNATH TUKARAM KHEDKAR


रुम्हणा येथील रंगनाथ तुकाराम खेडकर, वय ५३ ह्या शेतकऱ्याला दि. ३१ मे रोजी दुपारी एक वा. सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन कॉल आला. त्यात आपण सिंदखेडराजा येथील कृषी खात्याचा अधिकारी बोलत असून, तुमच्या पीक विम्याचे काही कागदपत्रे कमी आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे आधारकार्ड व इतर कागदपत्रे सोबत घेऊन लवकरात लवकर राहेरी ते जांभोरा मार्गावरील पांग्री उगले फाट्यावर या, असे सांगण्यात आले. त्यानुसार रंगनाथ खेडकर यांनी आधारकार्ड, इतर कागदपत्रे सोबत घेतले व मोटारसायकल क्र. एम. एच. २८ ए. एम. ३२२१ वरुन पांग्री उगले फाट्यावर गेले. त्यानंतर ते घरी परतले नाही, म्हणून कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी त्यांचा मोबाईल बंद आला. त्यानंतर वेळोवेळी संपर्क साधला असता मोबाईल बंदच येत होता. त्यामुळे कुटुंबातील काहींनी ग्रामस्थांसह पांग्री उगले फाट्यावर जाऊन बघितले. तेंव्हा त्यांची मोटारसायकल पांग्री उगले फाट्याच्या आतील बाजूला काही अंतरावर उभी असलेली आढळून आली.

त्यावेळी पुन्हा मोबाईल वरुन संपर्क साधला असता तो बंदच आला. त्यामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त होत घाबरुन जाऊन इतर ग्रामस्थांसोबत रंगनाथ खेडकर यांचा शोध घेतला, परंतु संध्याकाळपर्यंत शोध लागला नाही. याप्रकरणी त्यांचे चुलतभाऊ गबाजी खेडकर, वय ५० यांनी रात्री किनगावराजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठाणेदार सोमनाथ पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब तपास सुरू केला. त्यामध्ये साखरखेर्डा पोलीस हद्दीतील एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यावरुन तो कॉल केला असल्याचे निष्पन्न झाले .
दरम्यान दि. ३ जून, गुरुवारी दुपारी अमडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेनटाकळी तलावाच्या पेनसावंगी शिवारातील पाण्यात एक मृतदेह आढळून आला. त्यासंदर्भात पेनसावंगी पोलीस पाटील गीता प्रवीण शेजोळ यांच्या फिर्यादीवरुन व आढळून आलेल्या परिस्थितीवरुन खून करुन, पुरावा नष्ट करणे ह्या कलमांखाली अमडापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमित वानखडे, पीएसआय प्रवीण सोनोने, गजानन राजपूत आदि करीत आहेत.
अमडापूर पोलीस ठाणे हद्दीत मृतदेह सापडल्याची घटना समाजमाध्यमातून रुम्हणा येथे समजताच प्राचार्य शिवराज तोताराम कायंदे , ज्ञानदेव खेडकर, किशोर खेडकर, सचिन खेडकर, नितीन खेडकर, अशोक खेडकर, देवानंद कायंदे, देवानंद डोळे आदिंनी अमडापूर येथे जाऊन ओळख पटविली. त्यावेळी तो मृतदेह रंगनाथ तुकाराम खेडकर यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन झाल्यानंतर आज दि. ४ जून, शुक्रवारी दुपारी ४.३० वा. सुमारास रुम्हणा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
शेतकऱ्याला फोन कॉल येणे, तो शेतकरी गायब होणे व तपास सुरु असतांनाच त्याचा मृतदेहच आढळणे , अशा सतत पाच दिवसांच्या ह्या विचित्र घटनाक्रमामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, आरोपींनी पोलिसांपुढे आव्हान उभे केल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.