राहेरी वळणमार्गावरील पूलावरून वाहतुकीस परवानगी ; तब्बल दिडवर्षानंतर धावणार लालपरी
किनगावराजा दि.६(प्रतिनिधी) राहेरी बुद्रुक येथील खडकपूर्णा नदीवरील पूल कमकुवत झाल्यामुळे गत दीड वर्षांपासून बंद असलेली वाहतूक वळणमार्गावरील नवीन पर्यायी पूल तयार झाल्यामुळे पूर्ववत सुरु झाली असून दीड वर्षांपासून बंद असलेल्या एसटी महामंडळाच्या लालपऱ्या आता त्यावरून धावणार असून या मार्गावरील प्रवाशांनाही आता मोठा दिलासा मिळाला आहे.
खडकपूर्णा नदीवरील पूल कमकुवत झाल्यामुळे अपघातहानी होऊ नये याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत जड वाहतुकीसाठी सदर पूल बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.परंतु या पुलावरून वाहतूक बंद झाल्यामुळे महिला,वृद्ध,विद्यार्थी,व्यापारी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता.महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे या मार्गावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांनाही प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. याकरिता पर्यायी वळणरस्ता व पूल लवकर सुरु करण्यात यावा याकरिता सिंदखेडराजा येथील राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे,सिंदखेडराजाचे नगराध्यक्ष अतिष तायडे,संदीप मेहेत्रे,संतोष बरडे,आदींनी दिनांक १४ जून रोजी सर्वपक्षीय आंदोलनाची हाक दिल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी वळण रस्ता शक्यतो ३० जुलैपर्यंत वाहतुकीसाठी तयार होईल असे पत्र दिले होते. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार सुनील सावंत यांनी सतत पाठपुरावा करून वळण रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करून सदर रस्त्यावरून वाहतूक सुरु केली.
पूर्वी या महामार्गावरून औरंगाबाद,पुणे,मुंबई,नाशिक,सांगली,सातारा,बारामती,नागपूर,वर्धा,अकोला आदी ठिकाणी जाण्यासाठी महामंडळाच्या बसेस सुरु होत्या.कमकुवत पुलामुळे बसेस बंद असल्याने याठिकाणी जाण्याकरिता प्रवाशांची कूचंबना होत होती.वळणरस्ता आता खुला झाल्याने शासनाची हक्काची बससेवा सुरु झाल्याने या महामार्गावरील प्रवाशांच्या चेहेऱ्यावर आनंद झाल्याचे चित्र दिसत आहे.