
शेगांव प्रतिनिधी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे.त्यांनी आक्रमकपणे केलेला भाजप विरोध सर्वसामान्य जनतेला चांगलाच भावला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा पहिलाच जिल्हा दौरा आहे . आज ते बुलढाणा दौरा करून शेगाव येथे येत आहेत. त्या अनुषंगाने शेगाव शहर व जळगाव जामोद मतदारसंघांमध्ये सातत्याने होणारी काँग्रेसची पीछेहाट रोखण्यासाठी ते काही ठोस भूमिका घेतात का ? असा प्रश्न सर्वसामान्य काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
जळगाव जामोद मतदारसंघांमध्ये सुमारे १५ वर्षांपासून पासून विधानसभेत भाजपाचा एकहाती बालेकिल्ला आहे.भाजपाचे आमदार संजय कुटे यांच्या विरोधात जेव्हा जेव्हा काँग्रेसतर्फे उमेदवारी दिली तेव्हा तेव्हा अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागल्याचा इतिहास आहे. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत तर काॅंग्रेस तीन नंबर वर फेकल्या गेली होती. यावेळी उमेदवारी मिळावी म्हणून झालेलं रणकंदन आणि नाराजी व एकूणच आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्वकीयांनीच भाजपाचे उमेदवारास केलेल्या छूप्या मदतमुळेच कॉंग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले हे जगजाहीर आहे .
आता जळगाव जामोद मतदार संघात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी व काँग्रेसला लागलेला गटबाजीचा रोग दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठोक भूमिका घेतील काय ? व आगामी निवडणुकीसाठी सर्वमान्य असा उमेदवार नाना पटोले भविष्यात निश्चित करतील काय ? व त्या अनुषंगाने जळगाव जामोद काँग्रेसला तशा सूचना करतील काय? असेही प्रश्न या अनुषंगाने व्यक्त होत आहेत.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा मात्र उंचावल्याचे चित्र आहे .