मुसळधार पर्जन्यधारांनी जिल्हा चिंब सिंदखेड राजा, चिखली व मोताळा तालुक्यात दमदार पाऊस कोराडी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
दि. 29 – जिल्ह्यात 28 जुन रोजी मुसळधार पर्जन्यधारांची बरसात झाली. पावसाने सर्वत्र हजेरी लावत कमी-अधिक प्रमाणात पर्जन्यदान केले. यामुळे निश्चितच खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. घाटावरील तालुक्यांमध्ये दमदार पर्जन्यवृष्टी झाली, तर घाटाखालील तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा उर्वरित पेरण्या करण्यासाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सिंदखेड राजा, चिखली व मोताळा तालुक्यात दमदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. सिं. राजा तालुक्यातील कोराडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदी पात्रात पाणी वाहत आहे.
जिल्ह्यात आज 29 जुन 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची – सर्वात जास्त पाऊस सि. राजा : 48.1 मि.ली (250.7 मि.ली), चिखली : 43.2 (234.5 मि.ली), मोताळा : 36.9 (113.4), बुलडाणा : 30 (130.3), मेहकर : 27.5 (259.9), दे. राजा: 26.3 (149), मलकापूर : 25.8 (69.4), लोणार : 24.2 (151), जळगांव जामोद : 19.4 (43.6), खामगांव : 13.3 (155.3), संग्रामपूर : 12.8 (115.3), नांदुरा : 12.1 (74.8) आणि सर्वात कमी शेगांव तालुक्यात : 6.6 (32.2) मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 326.2 मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 25.1 मि.ली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस शेगांव तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2021 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 136.9 मि.ली आहे.
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार कोराडी मध्यम प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे सांडवा वाहत आहे. रात्री 10.30 वाजेदरम्यान प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदी पात्रात 10 से.मी उंचीचा 8.76 क्युबीक मीटर प्रति सेकंद विसर्ग होत होता. त्यामुळे नदीकाठावरील मेहकर तालुक्यातील नागझरी, कल्याणा, नेमतापूर, फर्दापूर गावांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.