सिंदखेड राजा निरामय जीवनासाठी योग, प्राणायाम व व्यायाम सर्वोच्च स्थानी असल्याचे मान्य करत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जगात 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधत मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे निसर्गाई फाऊंडेशन द्वारा संचालित धरती बचाओ परिवाराचे विश्वस्त वनश्री.जना बापू मेहेत्रे यांच्या पुढाकारातून तथा भारत स्वाभिमान ट्रस्ट, पतंजली योग समिती व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या सक्रीय सहभागातून व नगरपरिषद सिंदखेडराजा यांच्या सौजन्यातुन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा उद्घाटन सोहळा आज दिनांक 17 जून रोजी पार पडला.
Covid-19 च्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करत सीमित योग साधकांच्या उपस्थितीत बालयोगी वरद संतोष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन सोहळा पार पडला.

वृक्ष पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन सिंदखेडराजा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सतीश तायडे,उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी,पंचायत समिती सिंदखेडराजा राजा चे माजी सभापती शिवाजीराजे जाधव, ह.भ.प.जानकीराम खांडेभराड,पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भाई खरात,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शिवप्रसाद ठाकरे,योगशिक्षक ए. एस.तरवडे,योग प्रेमी दिलीपजी काळे,अतुल खेकाळे,संतोष जोशी तथा वनश्री.मेहेत्रे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी आरोग्य संवर्धनासाठी तथा रोगप्रतिकारक शक्ती वाढवून विविध रोगांना प्रतिबंध करण्यासाठी व अनेक रोगांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने नित्य नियमाने योगा करण्याचे आवाहन केले.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी आनंद प्राप्तीसाठी व खरे खरेखुरे जीवन जगण्यासाठी मी दररोज योगा करतो.आपणही दररोज योगा करा.असे आवाहन केले.योग प्रेमी शिवाजीराजे जाधव यांनी आपल्या चोवीस तासातील एक तास योगासाठी देण्याचे सांगितले तर अध्यक्षीय मनोगतात राजेंद्रभाई खरात यांनी आम्ही सर्वजण समाजाला योग सेवा प्रदान करण्यास कटिबद्ध असल्याचे अभिवचन दिले.
साधारणतः दीड तास चाललेल्या या योग शिबिरात योगशिक्षक बाल योगी वरद संतोष जोशी यांनी चित्तथरारक आसने करून तथा योग प्राणायामाचे प्रात्यक्षिके दाखवून प्रत्येकाकडून योग प्राणायाम करून घेऊन योग साधकांना मनमुराद हसवले व मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे आयोजक वनश्री. जनाबापू मेहेत्रे यांनी 21 जून पासून पुढील शंभर दिवस दररोज व्हाट्सअप,फेसबुक तथा यूट्यूब च्या माध्यमातून समाजाला योग्य सेवा देणार असल्याचे अभिवचन दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी.बी.सी.न्यूज चॅनल,आदर्श मराठी प्राथमिक शाळा,नगरपरिषद सिंदखेडराजा, स्वरूप ठाकरे,प्रदीप कुटे,कृष्णा अवचार,निर्मिक मेहेत्रे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांनी केले. तर उपस्थितांचे आभारही त्यांनीच मानले.