
बुलडाणा- दि. 9 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने संकेतस्थळाचे निर्माण करण्यात आलेले आहे. या संकेतस्थळावर बुलडाणाविषयी संक्षिप्त माहिती, क्रीडा विषयक योजना व उपक्रमांची माहिती, शासन निर्णय, अनुषंगिक अर्ज तसेच जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कारार्थींची व क्रीडा शिष्यवृत्ती धारकांची माहिती, अनुदान लाभार्थींची यादी, क्रीडा स्पर्धा नियोजन, जिल्ह्यातील क्रीडा संकुल व क्रीडा सुविधांची अद्यावत माहिती, जिल्ह्यातील क्रीडा संघटनांची माहिती अशा क्रीडा विषयक बाबींची माहिती नागरीकांना सुलभरित्या उपलब्ध होण्याच्या तसेच सर्वसामान्य नागरीकांना क्रीडा विषयक बाबींची माहिती होणेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा यांचेवतीने http://buldhana sports.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आलेले आहे. भविष्यात या संकेतस्थळाच्या माध्यमातुन यानंतरही क्रीडा विषयक उपक्रमांची माहिती उपलब्ध होणार आहे.
त्यानुषंगाने जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांचेहस्ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचे वतीने तयार करण्यात आलेल्या http://buldhanasports.com या संकेतस्थळाचे विमोचन 8 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात करण्यात आले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरीक यांनी या संकेतस्थळाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी कळविले आहे.