बुलडाणा दि. 9 – : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्तरावरील स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या किंवा सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात सुधारीत शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे.
सेवा हमी कायद्यानुसार ग्रेस गुण देण्याकरीता ऑनलाईन पोर्टल सिस्टीम https://schooleducation.mahaonline. gov.in कार्यरत आहे. सदरच्या संकेतस्थळ जाऊन विद्यार्थी किंवा खेळाडूंनी प्रथम आपली नोंदणी करुन क्रीडा गुण सवलतीचा अर्ज, परिक्षेचे हॉल तिकीट (ओळखपत्र) आणि खेळाचे प्रमाणपत्र यासोबत अपलोड करणे गरजेचे आहे. सदर प्रस्तावाची हार्डकॉपी किमान 2 प्रतीमध्ये त्यानुसार संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपुर्ण प्रस्ताव विहीत नमुण्यात अर्ज, हॉलतिकीट, युडायस क्रमांकासह, मान्यता प्राप्त खेळाचे प्रमाणपत्र, शालेय परिशिष्ट ई, संघटना परिशिष्ट 10 या वेबसाईटवर दिनांक 15 जून 2021 रोजी सायं 5 वाजेपर्यंत ऑनलाईन किंवा कार्यालयात येवून ऑफलाईन पध्दतीने सादर करावे.
तसेच विद्यार्थी गुणसवलती पासुन वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत खेळाडू/संस्थेची /शाळेची राहील. बोर्डाकडून काही सुचना प्राप्त झाल्यास तसे कळविण्यात येईल. प्रचलीत शासन निर्णयानुसार गत तीन वर्षातील व चालु वर्षातील संबंधीत खेळाडूने क्रीडा स्पर्धत सहभागी होणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे असामान्यपरिस्थितीमुळे सन 2020-21 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) साठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 8 वी व 9 वी मध्ये सदर विद्यार्थ्याने सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच सन 2020-21 या वर्षात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) साठी प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी पुर्वी म्हणजेच इयत्ता 11 वी मध्ये क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे आवश्यक आहे. या सर्व निकषानुसार पात्र असलेले प्रस्ताव शाळांनी, महाविद्यालयांनी द्वि-प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे 15 जून 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
तसेच शाळा/संस्थांना व एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांनी जिल्हास्तर/विभागस्तर/राज्यस्तर स्पर्धेचे संपुर्ण विस्तृत अहवाल या कार्यालयाच्या या dsobld@gmail.com ई-मेल वर पाठवावे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार कोरोना 19 विषाणुच्या प्रतिबंधाकरीता जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमाचे / निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करुन कार्यवाही करावी व अधिक माहितीकरीता अनिल इंगळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक 9970071172 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.