दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रूग्णसंख्या गृहीत धरून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी -पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
बुलडाणा दि.11 : दुसऱ्या लाटेमधील रूग्णसंख्या ओसरू लागली आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासन, प्रशासनाने काटेकोर नियोजन करीत प्रयत्न केले. मात्र ही परिस्थिती सध्या पुढील काळात जेव्हा लाट येईल किंवा रूग्णसंख्या वाढेल त्यावेळेस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयारी म्हणून उपयोगात आणावी. दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रूग्णसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त रूग्णसंख्या गृहीत धरून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. त्या पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, सहा. आयुक्त श्री. बर्डे आदी उपस्थित होते.
भविष्यात कोविड रूग्णांची 10 हजार संख्या लक्षात घेता नियोजन करण्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, त्यानुसार ऑक्सिजन बेड, नॉन ऑक्सिजन बेड, व्हेन्टींलेटर, ऑक्सिजन निर्मिती साठा व पुरवठा, जिल्ह्यातील ऑक्सिजन लिक्वीड टँक, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन, औषधांचा साठा आदींची व्यवस्था करण्यासाठी आतापासून कामाला लागावे. आरोग्य यंत्रणेतील पायाभूत सोयी सुविधा बळकट कराव्यात. पीएसए प्लँटसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील जुन्या कोविड केअर सेंटर किंवा तालुक्यातील मोठे गाव असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आदींमध्ये ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था करावी. तिसरी लाट गृहीत धरून बाल रोग तज्ज्ञांची सेवा अधिग्रहीत करून ठेवावी. बाल रोग वार्ड तयार करून त्यामध्ये ऑक्सिजनची सुविधा तयार करून ठेवावी.
म्युकर मायकोसिस रूग्णांचा उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या आजारावरील महागडी औषधांचा समावेशही महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यंत्रणांनी समन्वय ठेवत कोविड पश्चात उपचार पद्धती राबवावी. कोविड होवून गेलेल्या रूग्णांशी संवाद साधून अथवा त्यांना संपर्क करून तब्येतीची विचारपूस करावी. जिल्हा सामान्य रूग्णालयात पोस्ट कोविड रूग्णांसाठी वार्ड तयार करावा. पोलीस विभागाने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी. नागरिक अनलॉक झाल्यानंतर कोरोना प्रादुर्भाव संपल्यासारखे वागत आहेत. तरी नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे व हात सॅनीटाईज किंवा वारंवार धुणे या त्रीसुत्रीचा वापर करावा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.