दुर्गासिंग सोळंके बुलढाणा - देश कोणत्या दिशेने चालला आहे? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्व बंद होते पण एकच उद्योग सुरु होता तो म्हणजे शेती! एकशे पस्तीस कोटी जनतेच्या पोटाची खळगी भरून देणारा शेतकरी मात्र उपाशीपोटी राहिला, नव्हे तर जाणीवपूर्वक तसेच ठेवले जात आहे. हा माझा शेतकरी शेतात राबलाच नसता तर लोक कोरोनापेक्षा उपासमारीने मेले असते! पण याची जाणीव केंद्र सरकारला नाही. प्रधानमंत्री किसान योजनेचे दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून त्याचा महोत्सव साजरा करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार केला पाहिजे. नुकतेच शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये भरून त्याचा इव्हेंट साजरा करणारांनी रासायनिक खतांच्या किमती दिडपटीने वाढवून शेतकऱ्यांच्या कबरी खणून ठेवल्या आहेत!कोरोनामध्ये हजारो लोक मरत आहेत हे कमी की काय म्हणून महागाई वाढवून सरकार जनतेला लुटत आहे!
पेट्रोल महाग, डिझेल महाग, गँस महाग, शेती औषधे महाग आणि आता तर जगणेच महाग करून टाकले आहे! औद्योगिक क्षेत्रात बेरोजगारी, शेती क्षेत्राची ही अवस्था, आंतरराष्ट्रीय स्तरावर बेअब्रू, लोक उपाशी आणि संसर्ग रोगाचे बळी ठरत आहेत आणि यांना राम मंदिर सुचते आहे! लोक जीवंत राहिले तरच धर्म टिकेल ना? माणसं मारून कसला धर्म जीवंत ठेवत आहात? जात आणि धर्म ही या देशाची प्राथमिकता कधीच नव्हती आणि असणारही नाही!
लोकसंख्येचा बागुलबुवा उभा करून जबाबदारी टाळू नका कारण देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या फक्त पस्तीस कोटी होती, तेव्हा आपण अन्नधान्य आयात करत होतो. आज देशाची लोकसंख्या ऐकशेपस्तीस कोटी आहे आणि आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत फक्त स्वयंपूर्ण नाही तर निर्यातदार झालो आहोत! मोदींना हा देश समजला नाही. लोकसंख्या वाढली तरी ग्रामीण भागाच्या विकासातून सर्व समस्या दूर होऊ शकतात.
शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करतो, शेतमालाला दर दिडपटीने देतो, टाळ्या घेण्यासाठी ही वाक्ये ठिक आहेत परंतु वास्तवात काय आहे? माझा शेतकरी गेली पाच महिने दिल्लीमध्ये आंदोलन करतो आहे, त्यांना भेटण्याचे साधे सौजन्य तुम्ही दाखवू शकला नाही, याच्या इतका क्रुषीप्रधान देशाचा अपमान दुसरा नाही! क्रुषी कायदे करतात कमीतकमी दर किती असणार याचा उल्लेख न कायदा पास करुन शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास तुम्ही आवळला आहे आणि आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांच्या आयुष्याशी मोदी यांचे केंद्र सरकार खेळत आहे!
अगदी वानगीदाखल सांगतो ईफकोचे 12.32.16 या रासायनिक खताची पुर्वीची किंमत होती 1190 रु.आता ते खत 1800 रु.ला मिळणार,20.20.0 ची किंमत होती 975 आता ते मिळणार 1350 रु.ला!ईफको, आयपीएल, महाधन, जी.एस.एफ.सी.या कंपन्यांच्या खतांचे दर गगनाला भिडले आहेत.
मोदीजी, तुमची ही वाटचाल असेल तर शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार? दोन चार उद्योपतींची श्रीमंती म्हणजे देशाची श्रीमंती का? म.गांधी म्हणाले होते, गरीब हसला पाहिजे आणि श्रीमंत समाधानी असला पाहिजे, यालाच मी रामराज्य मानतो! या विचार सरणीत मोदी तुम्ही कुठे बसता? तुम्ही गांधींच्या पुतळ्याला हार घालता आणि गोडसेच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होता! हा कसला राष्ट्रवाद? गेल्या वर्षी अमित शहा पासून ते सगळे अर्धी चड्डीवाले तबलिगिच्या नावाने बोंबा मारत होता आणि आज कुंभमेळा आणि निवडणूक आयोग यांच्या मुळे संपूर्ण भारत कोरोनामध्ये तडफडत आहे, याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल!
कांही संघटनांची मानसिकता विक्रुत असते!त्यांना गरीब माणसे तडफडत असताना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात त्यापैकी केंद्र सरकार आहे असे वाटायला जागा आहे. कोरोनामध्ये देश होरपळून निघत आहे, शेतकरी महागाईच्या वरवंट्याखाली चिरडून टाकला जात आहे, बेरोजगार वैफल्यग्रस्त जीवन जगत आहेत, ज्यांना नोकऱ्या आहेत त्या केव्हाच गेल्या आहेत, सर्व सरकारी यंत्रणा सरकारची बटिक झालेल्या आहेत, त्यामुळे आज देश अराजकाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे!
शेतकरी आणि शेती संपली तर देश आणि देशाचे अस्तित्व संपेल! ज्या देशातील सुप्रीम कोर्टाचे पाच न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सरकार पासून धोका आहे असे सांगतात तो देश स्वतंत्र कसा मानायचा? विशेष म्हणजे त्यापैकी एक नंतर खासदार होतो म्हणजे काय?विद्वत्ता सुध्दा बटिक झाली असे म्हंटले तर चुक काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहंकार सोडावा, देशातील जनतेच्या जीवाशी खेळू नये. जनता मुर्ख नाही, अनेकांना याच जनतेने धुळ चारली आहे! तुमचा पाला करायला फार वेळ लागणार नाही ,तेव्हा सावधान! हा देश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो, निधर्मी राज्य व्यवस्था या देशाने स्विकारली आहे!अनेक सत्तांतरे या देशातील जनतेने केलेली आहेत!म.गांधी, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले यांच्या विचारसरणीचा वारसा आहे आणि भ.गौतम बुद्ध, भ.महावीर ,संत ज्ञानेश्वर ते गाडगेबाबा ही आमची उज्वल परंपरा आहे, या परंपरेच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न करु नका!
म्हणून ज्या देशाने शेतकरी हित नाकारले ते देश संपले आहेत. नरेंद्र मोदींनी सत्तेचा ताम्रपट घेऊन आल्याच्या अविर्भावात वावरू नये! आम्हाला तुमचे वर्षाला मिळणारे सहा हजार रुपये सुध्दा नकोत फक्त रास्त धोरण राबवा! अन्यथा तुम्ही आमच्या तिरड्या बांधण्याची वाट बघू नका, त्या अगोदर तुम्हाला विसर्जित करु! अहंकार, अहंगंड, चेल्यांची मस्तवाल भाषा थांबवून गरीब, पददलित, शेतकरी हा या देशाचा कणा आहे तो उध्वस्त करण्याचे पाप करु नका!
