बुलडाणा दि.16 :- ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन लवकरच सुरू करण्यात येणारआहे. या हेल्पलाईनचा क्रमांक 14567 राहणार असून ही राष्ट्रीय हेल्पलाईन असणार आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जनसेवा फाऊंडेशन पुणे व राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन चालविल्या जाणार आहे.
या हेल्पलाईनचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे असणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी हेल्पलाईनचा उपयोग होणार आहे. हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 असून हेल्पलाईनची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. हेल्पलाईन केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर व 1 मे वगळता सर्व दिवस सुरू असणार आहे. हेल्पलाईन मार्फत आरोग्य जागरूकता, निदान, उपचार, निवारा, घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक , अध्यात्मिक, कला व करमणूक माहिती दिल्या जाणार आहे. तसेच कायदेविषयक मार्गदर्शन, विवाद निराकारण, पेन्शन संबंधित मागर्दर्शन व शासकीय योजनांची माहितीही दिल्या जाणार आहे.
तसेच चिंता निराकारण, नातेसंबंध व जीवन व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधीत शोक, वेळ, ताण, राग व्यवस्थापन, मृत्यूपुर्वीचे दस्तऐवजीकरण आदी भावनिक समर्थनार्थ मार्गदर्शनही केल्या जाणार आहे. क्षेत्रीय पातळीवर बेघर, अत्याचारग्रस्त, हरविलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी हेल्पलाईन कार्यरत राहणार आहे. या हेल्पलाईनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केलेले आहे. हेल्पलाईनबाबत जनसेवा फाउंडेशनच्या मिनाक्षी कोळी यांनी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांना अवगत केले. तरी हेल्पलाईन बाबत नागरिकांनी ज्येष्ठांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.