निवड यादीतील प्रवेशाला 11 जुन पासुन प्रारंभ शैक्षणिक वर्ष 2021- 22 ची आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलडाणा : – जिल्हयातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- 2009 नुसार दरवर्षी प्रमाणे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. सदर प्रक्रियेअंतर्गत सोडतीव्दारे राज्यस्तरावरुन खाजगी शाळांतील 25 टक्के कोटा अंतर्गतचे प्रवेश निश्चीत केले जातात. त्यानुसार 2021-22 या वर्षांच्या आरटीई 25 टक्के प्रक्रियेच्या प्रवेशाची सोडत (लॉटरी) 7 एप्रील 2021 रोजी राज्यस्तरावरुन काढण्यात आलेली आहे. परंतू कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे प्रवेशाची प्रक्रिया शासन स्तरावरुन तात्पुरती पुढे ढकलण्यात आली होती. शासनाचे दि. 4 जुन 2021 रोजीचे पत्रानुसार प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या सुचना आहेत.
त्यानुसार सन 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रक्रियेअंतर्गत ज्या विदयार्थ्यांना आरटीई 25 टक्के कोटामध्ये निवड यादी ची लॉटरी लागली आहे. त्या मुलांचे पालकांनी दि.11 जुन 2021 पासुन, संबंधित शाळेत जाऊन तात्पुरता प्रवेश निश्चीत करावा. प्रवेशासाठी पालकांनी जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी पुरावा,आधार इत्यादी बाबतची मुळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती सोबत ठेवाव्यात. शाळेमध्ये कागदपत्र पडताळणी करीता पालकांनी एकाच वेळी न जाता, ज्या पालकांना शाळेकडून मेसेज प्राप्त होईल त्याच पालकांनी शाळेत जावे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शाळांनी गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
प्रवेश प्रक्रिया 11 जुन 2021 पासुन सुरु होत असून, पालकांना प्रवेशासाठी 20 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे. याची नोंद जिल्ह्यातील शाळा व पालकांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद बुलडाणा कार्यालयाचे वतीने करण्यात येत आहे.