- जिल्हाधिकारी हिरवी झेंडी दाखवून उद्या करणार शुभारंभ…
- कोरोना पश्चात आरोग्य, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग इत्यादी तपासणी विनामूल्य होणार
विवेकानंद आश्रम आरोग्य सेवेशी कटिबध्द असलेली सार्वजनिक संस्था आहे. गेल्या 50 वर्षांपासून संस्थेचे विविध उपक्रमांतून सुरू असलेले मानवसेवाकार्य सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकले आहे. कोरोना महामारीच्या काळात गावाची फवारणी, मोफत सॅनेटायझर, मास्क वितरण, स्थलांतरीत परप्रांतीय मजूरांच्या भोजनाची व्यवस्था या साध्या बाबींपासून संस्थेचे स्वतंत्र कोरोना उपचारकेंद्र सुरू करणे व दुर्गम भागातील रूग्णांना वेळेवर ऑक्सीजन, व्हेंटिलीटर सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत सेवा करण्याचे कार्य संस्थेच्या आरोग्य विभागाने केले आहे. कोराना पश्चात रूग्णांची स्थिती जाणून घेऊन उपचार करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे फिरते रूग्णालय तज्ञ डॉक्टरांच्या चमूसहित उद्या दि.1 जुलै पासून लोकांच्यासेवेत दाखल होणार आहे. या मोफत शिबीरात स्त्रीयांचे आजार, लहान मुलांचे आजार, कोरोना पश्चात रूग्णांचे आजार, नेत्ररोग इत्यादीची तपासणी केल्या जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी एस.राममूर्ती व आ.डॉ.संजय रायमूलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/06/shu.jpg)
जिल्हाशल्य चिकित्सव डॉ.तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र सांगळे हे सुध्दा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. परिसरातील सर्व खेडयांमध्ये दररोज एक याप्रमाणे आश्रमाचे आरोग्य पथक जाणार असून जि.प. प्राथमिक शाळेत या शिबीराचे आयोजन केल्या जाणार आहे. गावातील सरपंच, ग्रामसेवक व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे सहकार्य सुध्दा लाभणार आहे. निष्काम कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजांचे संपूर्ण जीवन जनतेला निरायम आरोग्य प्रदान करण्यात, त्यांचे जीवन सुखी, समाधानी करण्यात व त्यांचा उत्कर्ष करण्यात खर्च झाले आहे. विवेकानंदांनी सांगितलेला मंदिरातील देवाच्या पूजनापेक्षाही मानवी रूपात साक्षात आपल्या समोर उभ्या असलेल्या दरिद्री नारायणाची सेवा हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे. हा उपदेश विवेकानंद आश्रमाच्या वाटचालीचा व सेवा कार्याचा मूलमंत्र आहे. त्यानुसार कोराना काळात लोकांवर आलेल्या जीवघेण्या संकटात त्यांना आधार देण्यासाठी, त्यांचे दुःख दूर करण्यासाठी आश्रमाचे फिरते रूग्णालय गावोगावी जावून रूग्णांची तपासणी करणार आहे. दररोज सकाळी 8 ते 11 यावेळात डॉक्टर तपासणी करणार आहेत. शिबीरा दरम्यान सोशल डिस्टसिंगचे पालन कटाक्षाने करण्यात येणार असून यावेळी प्रत्येकाला मास्क व सॅनेटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात आल्याचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर बी. मालपाणी यांनी सांगीतले. उद्या दि.1 जुलै रोजी पहिल्या दिवशी डॉक्टरांचे पथक गजरखेड या गावात जाणार आहे. गरजखेडवासीयांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन आश्रमाच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.