बुलडाणा – : तंत्र शिक्षण संचालनालयाच्या सुचनेनुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे. आरक्षीत जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तरी ज्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले नाही, त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करावा.
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत : तीन महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा, तसेच जात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केलेले आहे व ज्यांना त्यांचे अर्जात असलेल्या त्रुटींबाबत एसएमएस द्वारे कळविण्यात आलेले आहे. त्यांनी तात्काळ ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने त्रुटींची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.