सिंदखेडराजा प्रतिनिधि रवींद्र सुरुशे :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या काही प्रमाणात राज्यांतर्गत व जिल्हा अंतर्गत बस सेवा चालू करण्यात आली आहे. परंतु अद्यापही ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही.त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ही ग्रामीण भागातील बस सेवा लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, परिवहन सेना व विद्यार्थी सेनेच्या वतीने सिंदखेडराजा डेपो व्यवस्थापकांच्या माध्यमातुन आगर व्यवस्थापकाकडे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या लॉकडाऊन मुळे राज्यांतर्गत व जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात अद्यापही बससेवा सुरू करण्यात आलेली नाही.
पेरणीचे दिवस जवळ आलेले असुन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. तसेच शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी साठी लागणारे कागदपत्रे गोळा करण्यासाठी सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते परंतु ग्रामीण भागातील रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या सध्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची तसेच नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. ग्रामीण भागामध्ये ये जा करण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही. काही थोडेफार खाजगी वाहने उपलब्ध आहेत परंतू कोरोनाचे कारण दाखवुन काही खाजगी प्रवाशी वाहतुक करणारे प्रवाशांकडून जास्त दराने भाडे वसूल करतात यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. या सर्व बाबिंकडे पाहता ग्रामीण भागातील बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मनसे परिवहन सेना तालुका अध्यक्ष महेंद्र पवार, मनविसे जिल्हाध्यक्ष शिवा दादा पुरंदरे, जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव, मनसे तालुकाध्यक्ष निलेश देवरे,अंकुश चव्हाण,अभिजीत देशमुख,भागवत राजे जाधव, पवन राजे जाधव आदी उपस्थित होते.