पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांचे आवाहन

सिंदखेडराजा – आज पर्यावरण संवर्धन काळाची गरज झालेली आहे. वर्तमान तथा भविष्यात प्रत्येकाला निरामय व निर्धोक जीवन जगता यावे यासाठी प्रत्येकाने आपले पर्यावरण संवर्धनात्मक राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करणे सर्वोच्च महत्त्वाचे आहे.म्हणूनच प्रत्येकाने आजन्म पर्यावरणपूरक जीवनशैली अंगी कारण्याचे आवाहन ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना केले.
सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन चे विद्यमान उपसरपंच श्री.भगवानराव जायभाये व सेवानिवृत्त भारतीय सैनिक श्री.प्रल्हादराव जायभाये यांचे वडील स्व.कारभारी संतूजी जायभाये यांचे 10 जुलै 2021 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यविधी नंतर विधिवत तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन नदी,तलाव धरण किंवा धार्मिक स्थळी जलाशयात केले जाते.परंतु जायभाये परिवार,परिवारातील प्रल्हादराव जायभाये,भगवानराव जायभाये,चि.प्रदीप जायभाये, सावखेड तेजन चे सरपंच संदिपभाऊ नागरे,शिवसेना नेते विलासभाऊ विघ्ने,वनश्री.जना बापू मेहेत्रे यांनी परंपरेला फाटा देऊन स्वर्गीय कारभारी जायभाये यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मशानभूमीत खड्डे खोदून त्यात रक्षाविसर्जन करून त्यात एकूण 36 वृक्ष लावून त्यांच्या संगोपनाचा संकल्प करून गावकऱ्यांच्या मदतीने पूर्ण केला. या निमित्ताने स्मशानभूमीत कडुलिंब,करंज,अशोका,बेल, चाफा,पाम,जास्वंद कन्हेर, पारिजातक आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले.
रक्षाविसर्जन प्रसंगी मार्गदर्शन करताना वनश्री.जनाबापू मेहेत्रे पुढे म्हणाले की आपल्या सर्वांच्या मौलिक सहकार्यातून तथा धरती बचाओ परिवाराच्या मार्गदर्शनात जायभाये कुटुंबाने उचललेले हे पाऊल समाजासाठी दिशादर्शक ठरेल व यातून सावखेड तेजन नगरीला एक वेगळे वलय प्राप्त होईल.म्हणूनच प्रत्येक गावातील नागरिकांनी पुढे येऊन शून्य जलप्रदूषण,स्मृती वृक्षारोपण, जलसंवर्धन तसेच जैवविविधता संवर्धनासाठी वचनबद्ध होणे नितांत गरजेचे असल्याचे प्रतिपादन मेहेत्रे यांनी केले.या संकल्पनेला शिवराजभाऊ कायंदे यांनी दुजोरा देत आम्ही ही या चळवळीत सहभागी असल्याचे सांगितले.
परमपूज्य भगवान बाबांच्या पदस्पर्शाने व अमृतवाणीने पुनीत झालेल्या सावखेड तेजन नगरीने मयत व्यक्तीची स्मृती जोपासत स्व.कारभारी संतूजी जायभाये यांच्या स्मृर्ती पित्यर्थ पर्यावरण संवर्धनासाठी उचललेल्या जायभाये परीवाराच्या पाऊलाची परिसरात एकच चर्चा होती.